जालना जिल्हा रुग्णालयात वर्षभरात झाले ४०० सर्पदंश रुग्णांवर उपचार; एकाही रुणास जीव गमवावा लागला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:44 PM2018-06-06T15:44:41+5:302018-06-06T15:44:41+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने २०१७ या वर्षांत जिल्ह्यातील ४०० सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे.
- दीपक ढोले
जालना : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने २०१७ या वर्षांत जिल्ह्यातील ४०० सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे, सर्पदंशाने एकाही रुणाला जीव गमवावा लागला नाही.
उन्हाळ््याच्या कालावधीत शेतकरी शेतीची कामे करीत असतांना सर्पदंश होण्याची भीती असते. तर पावसाळ््याच्या सुरूवातीस पाऊस झाल्यानंतर वारूळांमध्ये पाणी गेल्यावर साप बाहेर पडतात. त्यामुळे पावसाळ््याच्या प्रारंभी काळात साप बाहेर निघण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. परिणामी, सर्पदंश होण्याचे प्रमाणही वाढते. आपल्या भागात काही साप बिनविषारी असतात. परंतु नागरिकांमध्ये अज्ञानपणा असल्याने मोठी भीती असते.
जिल्ह्यात २०१७ यावर्षात ४०० जणांना सर्पदंश झाला. यात विशेष म्हणजे, एकाही रुणाला आपले प्राण गमवावे लागले नसल्याचे मोठे समाधान आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात महिन्याभरात सर्पदंश झालेले २० ते २५ रुग्ण येतात. त्यांच्यावर योग्य पध्दतीने आणि तातडीने उपचार करण्यामुळे त्यांना जीवनदान मिळण्यास मदत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांने सांगितले.
पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध
घाटीत पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. त्यामुळे एकाही रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले नाही. ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी शेतात व वसाहतीच्या ठिकाणी सापांचा वावर जास्त असतो. तसेच शेतामध्ये शेतकऱ्यांना पिकाला पाणी देताना सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते.
पावसाळ्यात होतात सर्पदंश
रुग्णालयाच्या अहवालानुसार पावसाळ्याच्या तीन ते चार महिन्यामध्ये सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. जूनमध्ये ४१ नागरिकांना सर्पदंश झाला आहे, तर जुलैमध्ये ६२, आॅगस्टमध्ये ५०, तर सप्टेंबरमध्ये ५४ जणांना सर्पदंश झाला.