जालना जिल्ह्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:40 AM2019-04-04T00:40:52+5:302019-04-04T00:41:14+5:30
जालना शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढच होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उन्हाचा पारा वाढू लागल्याने सर्वत्र तप्त वातावरण आहे. याचा मोठा फटका शेती कामालाही बसल्याचे दिसून आले. जालना शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढच होत आहे. यामुळे एकूणच जनजीवनावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर कडक ऊन पडत असल्याने प्रचारावरही त्याचा परिणाम होत आहे. बहुतांश उमेदवार आणि त्यांचे समर्थक हे सायंकाळी चार नंतर आणि सकाळी ११ च्या आत प्रचार उरकून घेत असल्याचे चित्र आहे. प्रचारा सोबतच दररोज गर्दीने फुलणारने रस्ते दुपारी एक ते पाच यावेळेत ओस पडलेले आहेत. दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनेकजण घराच्या बाहेर न पडणेच पसंस करत असल्याचे दिसून आले.
सध्या जे काही नागरिक त्यांच्या कामानिमित्त बाहेर पडत आहेत, ते सर्वजण पांढरा गमछा बांधून आणि डोळ्यांना गॉगल्स घालूनच बाहेर फिरताना दिसत आहेत. पांढरे कापड वापरणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. जालन्यात पांढरे कापड घालणे म्हणजे जास्तीत- जास्त तीन तासात ते धुळीने माखलेले असते. त्यामुळे पांढरे कपडे हे जालन्यात ज्यांच्याकडे प्राधान्याने चारचाकी गाडी आहे, तेच जास्त वापरत असल्याचे दिसून आले.
अनेक रस्त्यावर तर आता पूर्वीप्रमाणे गडद सावली देणारे झाडे देखील नामशेष झाले आहेत. सावली शोधूनही मिळत नसल्याचे वास्तव आहे.ऐन कडक उन्हाळ्यात जालनेकरांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. एकूणच वाढत्या उन्हामुळे थंडपेयाची विक्री वाढली असून, द्राक्ष, कैरी, टरबूज, खरबूज यांना मोठी मागणी असून, अननसही बाजारात दाखल झाले आहेत.
दक्षता घ्यावी
घराबाहेर पडताना पांढरा रूमाल बांधूनच बाहेर पडावे.
डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्सचा वापर करावा.
सुती व सैलदार कपडे वापरावे. जेणेकरून उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
तहान नसतानाही जास्तीचे पाणी प्यावे.
दुपारी १२ ते ५ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.
कृत्रिम थंडपेयांऐवजी दही, लिंबू शरबत, ताक, उसाचा रस, कैरीचे पन्हे आहारात नित्य घ्यावे.