जालना जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४१ अंशांच्या वरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:50 AM2019-05-19T00:50:20+5:302019-05-19T00:51:01+5:30
विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सावली देणारे वृक्ष जमीनदोस्त झाल्याने तापमानाचे चटके अधिक वाढत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एककीडे १३ कोटी वृक्ष लागवडीचा दावा केला जात आहे. असे असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरूच आहे. लावलेले वृक्ष जगविण्यासाठी कुठलीच प्रभावी यंत्रणा उभारण्यात शासनाला यश आले नाही. त्यामुळे वृक्षलागवड एक सोपस्कार बनली आहे. यामुळेच शहरासह ग्रामीण भागातील वन आच्छादित जमिनीचा टक्का लोप पावत आहे. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सावली देणारे वृक्ष जमीनदोस्त झाल्याने तापमानाचे चटके अधिक वाढत आहेत.
गेल्या तीन महिन्यांचा जालना जिल्ह्याचा वाढत्या तापमानाचा आढावा घेतला असता साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासुनच उन्हाचे चटके वाढत गेले. यामुळे यंदा कधी नव्हे तो उन्हाळा जालनेकरांना असह्य झाला. या उन्हामुळे शीतपेयांच्या विक्रीसह कूलर, एसी, पंखे यांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
एकूणच हा उन्हाळा बाजारपेठेसाठी मात्र दिलासादायक ठरला. असे म्हणल्यास वावगे ठरू नये. उन्हाळ्याची चाहूल ही संक्रांतीनंतर हळूहळू सुरू होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच जालना जिल्ह्याचा पारा हा २८ अंशांच्यावर सरकला होता. मार्चमध्ये हा पारा ३५ ते ४० अंशच्या दरम्यान दिसून आला. परंतु, एप्रिलच्या प्रारंभापासूनच उन्हाच्या कडाक्याने जोर धरला. १ एप्रिलनंतर तर जालन्याचा पारा हा ४० ते ४३ अंश या दरम्यान राहिला. मध्यंतरी उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत बाजारपेठेत शुकशुकाट दिसून यायचा. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असत.
उन्हाळ्याचा सर्वात मोठा फटका ज्याप्रमाणे माणसांना बसला; त्यापेक्षा कितीतरी अधिक फटका हा मुक्या प्राण्यांना बसला. तीव्र उन्हामुळे पाणवठे आटल्याने हरीण, वानर हे मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर आले आहेत. काही गावांमध्ये तर मोर आणि पोपट तसेच अन्य पक्ष्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. परंतु, त्याची कुठे नोंद नसल्याने हा प्रश्न दुर्लक्षित राहिला. उन्हाचा फटका पिण्याच्या पाण्यालाही बसला. बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक वाढल्याने आहे ते जलसाठेही कोरडे पडले आहेत.
वाढत्या उन्हाचा फटका माणसं, जनावरे यांना बसतोच बसतो. परंतु, शेती आणि फळबागांनाही या उन्हामुळे मोठा ताण सहन करावा लागतो. कृषी विज्ञान केंद्रात वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी तापमानाची दररोज नोंद ठेवली जाते.
एप्रिलनंतर १५ मे पर्यंत सरासरी ४५ दिवसातील तापमानाचा आढावा घेतल्यास या दिवसात एखादा दोन दिवस वगळता तापमानाचा पारा हा ४० अंशांवर राहिला असल्याची माहिती कृषी अभियंता पंडित वासरे यांनी दिली.