जालना : अखेर तुरीसाठी मिळाली जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:52 AM2018-03-23T00:52:19+5:302018-03-23T11:37:47+5:30
हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात जागा उपलब्ध झाल्याने आठवड्यापासून ठप्प असलेली तूर खरेदी गुरूवारी पूर्ववत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात जागा उपलब्ध झाल्याने आठवड्यापासून ठप्प असलेली तूर खरेदी गुरूवारी पूर्ववत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. लोकमतने या विषयी वृत्त प्रकाशित केले होते. याची नाफेडने दखल घेत तूर खरेदी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील शासकीय गोदामात गत वर्षाची १ लाख क्विंटल पेंक्षा जास्त तूर गच्च भरून आहे. परिणामी यावर्षीपासून हमीभावाने खरेदी करण्यात आलेली १२ हजार क्विंटल तूर जागेअभावी ठेवावी कोठे असा प्रश्न वखार महामंडळाला पडला होता. सुरुवातीला खरेदी केलेली तूर बसस्थानक परिसरातील सिटीवेअर हाऊस आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात ठेवण्यात आली होती. मात्र त्या गोदामाची क्षमता संपल्याने जागेअभावी तूर खरेदी बंद ठेवण्यात आली होती. जागाच नसल्याने दिवसभरात केवळ तीन-चार शेतक-यांकडून तूर खरेदी करण्यात येत होती. मात्र तूर खरेदी मंदावल्याने जडाई माता एजन्सीची देखील पंचाईत झाली होती. शेतकरी दररोज हमीभाव केंद्रावर चकरा मारून कर्मचा-यांना धारेवर धरत होते. मात्र तूर ठेवायला जागाच नसल्याने अखेर १४ मार्चपासून तूर खरेदी पूर्णत: बंद करण्यात आली होती. शेतक-यांची गैरसोयीबाबत लोकमतने गुरुवारी ‘तूर ठेवण्यासाठी कोणी जागा देता का.. जागा’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करताच जिल्हा मार्केटींग विभाग आणि वखार महामंडाच्या अधिकारी यांनी तातडीने हालचाली करून तूर ठेवण्यासाठी भोकरदन मार्गावर असलेल्या गोदामात जागा उपलब्ध करून दिली. यामुळे आठवड्यापासून ठप्प असलेली तूर खरेदी पूर्ववत झाली. पहिल्याच दिवशी ११ शेतक-यांची १३४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.