जालन्यात रेडिमेड फराळावर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 07:03 PM2018-10-24T19:03:04+5:302018-10-24T19:04:28+5:30
: दिवाळी सणानिमित्त रेडीमेड फराळ विक्री करत असलेल्या दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
जालना : दिवाळी सणानिमित्त रेडीमेड फराळ विक्री करत असलेल्या दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, वाढत्या मागणीमुळे पदार्थांचा दर्जा राहत नाही. परिणामी विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत म्हणून अन्न व औषधी प्रशासनाने मोहीम सुरु केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेडीमेड फराळ विके्रत्यांवर आता करडी नजर राहणार आहे.
पूर्वी फराळाचे विविध साहित्य घरोघरी बनविण्यात येत होते. मात्र, धकाधकीच्या काळात घरातून फराळ तयार करण्याचे प्रमाण कमी झाले. यामुळे अनेकांचा रेडीमेड फराळ खरेदीकडे कल वाढला आहे. दर्जाहीन साहित्य वापरून तयार करण्यात आलेली मिठाई आणि फराळ आरोग्यास अपायकारक आहे. यामुळे आत्तापासूनच अन्न आणि औषधी प्रशासनाने खबरदारी म्हणून परिसरातील मिठाईचे दुकानाची तपासणी मोहिम हाती घेतली आहे. तसेच हंगामी फराळ विक्रेत्यांनाही नोंदणी बंधनकारक करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त एस. ई. देसाई यांनी सांगितले.
दिवाळीतील फराळ हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. बाजारपेठेतही दिवाळीच्या अनुषंगाने मिठाईच्या दुकानांत विविध खाद्यपदार्थांची रेलचेल दिसून येते. विविध संस्थांकडून व हंगामी विक्रेत्यांकडूनही दिवाळी फराळ विक्र ीची दुकाने थाटण्यात आली आहेत. सध्याच्या धावपळीच्या काळात अनेक महिला नोकरी करत असल्याने घरीच दिवाळीचे पदार्थ बनवण्याऐवजी रेडिमेड मिळणारे फराळाचे साहित्य खरेदी करतात. मात्र हे पदार्थ चांगल्या पध्दतीने तयार करण्यात आले आहेत का? पदार्थाचा दर्जा कसा आहे, पदार्थाची गुणवत्ता, ते किती काळ टिकू शकतात यावर नेहमी प्रश्नचिन्ह असते. अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी अन्न औषध प्रशासनाकडून प्रत्येक सणासुदीच्या काळात तपासणी मोहीम हाती घेण्यात येते.
आॅनलाईन नोंदणी गरजेची
छोट्या व्यावसायिकांना चलन भरून आॅनलाईन पध्दतीने नोंदणी करावी लागणार आहे. मिठाई तसेच रेडीमेड फराळ खरेदी करताना ग्राहकांनी खबरदारी घ्यावी.
-एस. ई. सहाय्यक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, जालना.