जालना बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:28 AM2021-03-08T04:28:44+5:302021-03-08T04:28:44+5:30
(संजय लव्हाडे) जालना, : सर्व प्रकारच्या खाद्य तेलांच्या दरात एकतर्फी तेजी आली असून बाजरी, मका, सोयाबीन, लाल मिरची, हळद ...
(संजय लव्हाडे)
जालना, : सर्व प्रकारच्या खाद्य तेलांच्या दरात एकतर्फी तेजी आली असून बाजरी, मका, सोयाबीन, लाल मिरची, हळद महागले आहे. सोने चांदीच्या दरात मात्र मंदी आली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलांचे दर भडकल्यामुळे त्याचा परिणाम देशातील सर्व खाद्य तेलांच्या दरांमध्ये बघायला मिळत आहे. तेलाच्या आयात शुल्कामध्ये सरकारने सवलत दिली तरी, तेलांचे दर फारसे कमी होणार नाहीत. कारण, ज्या देशातून तेल आयात करायचे असते, त्या देशाने निर्यात शुल्क आधीच वाढवलेले असतात, अशी आजची स्थिती आहे.
सुर्यफूल तेलाच्या दरात विक्रमी तेजी आली असून ही तेजी पुढेही कायम राहील, असे जाणकारांना वाटते. सुर्यफूल तेलाचे दर १६९००, सोयाबीन तेल १२८००, पामतेल १२५००, सरकी तेल १२७००, करडी तेल १७००० आणि शेंगदाणा तेलाचे दर १७००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
बाजरीची आवक दररोज ३०० पोते इतकी असून भाव १२०० ते १४५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. मक्याची आवक ५०० पोते इतकी असून १५० रुपयांची तेजी आल्यानंतर भाव १३०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. सोयाबीनची आवक दररोज ३०० पोते इतकी असून १०० रुपयांची तेजी आल्यानंतर भाव ४९५० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
लाल मिरचीची आवक दररोज ५ टन इतकी असून २ हजार रुपयांच्या तेजीनंतर भाव १२००० ते १४००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. हळदीचे भाव क्विंटलमागे २ हजारांनी वाढले असून भाव १०००० ते ११००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. कोरोनामुळे बाहेरील देशांतून हळदीला चांगली मागणी असल्यामुळे हळदीचे दर तेजीतच आहेत.
या आठवड्यात महाशिवरात्र असली तरी शेंगदाणा, साबुदाणा, भगर तसेच उपवासाच्या इतर खाद्य पदार्थांचे भाव स्थिर आहेत. मात्र येत्या दोन दिवसांत त्यात तेजी येण्याची शक्यता आहे.
हरभरा डाळ ५८०० ते ६३००, तूर डाळ ९२०० ते १००००, मूग डाळ ८९०० ते ९७००, मसूर डाळ ६२०० ते ७०००, उडीद डाळ ८५०० ते १०५००, शेंगदाणा ८५०० ते १०५०० आणि साबुदाण्याचे दर ४४०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
नवीन आंबा जालना बाजारात आला असून आवक दररोज ३ क्विंटल आहे. साधारण आंब्याचे भाव १३० ते २०० रुपये प्रति किलो आणि हापूस आंब्याचे दर ८०० ते १२०० रुपये प्रति डझन असे आहेत.
सोने चांदीचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. सोन्याचे दर तोळ्यामागे २ हजार रुपयांनी कमी झाले असून ४५ हजार रुपये प्रति तोळा असे आहेत. चांदीचे दर किलोमागे ३ हजार रुपयांनी कमी झाले असून भाव ६७ हजार रुपये प्रति किलो असे आहेत.