जालना बाजारपेठ समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:24 AM2021-05-03T04:24:26+5:302021-05-03T04:24:26+5:30

(संजय लव्हाडे) जालना : ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून, बहुतांश वस्तुमालांच्या दरांमध्ये मंदी आली आहे. मे महिन्यासाठी ...

Jalna Market Criticism | जालना बाजारपेठ समालोचन

जालना बाजारपेठ समालोचन

Next

(संजय लव्हाडे)

जालना : ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून, बहुतांश वस्तुमालांच्या दरांमध्ये मंदी आली आहे. मे महिन्यासाठी साखरेचा कोटा २२ लाख टन इतका जाहीर झाला असून, यामुळे साखरेचे दर आटोक्यात राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आंब्याची विक्री मात्र चांगली होताना दिसत आहे.

देशभरातील लाॅकडाऊनमुळे बाजारपेठेत ग्राहकांची गैरहजेरी जाणवत आहे. त्यामुळे माल प्रचंड प्रमाणात असूनही उलाढाल होत नसल्याने व्यापारी परेशान झाले. सर्व प्रकारच्या तेलांच्या दरात लागोपाठ सुरू असलेल्या तेजीला सरत्या आठवड्यात ब्रेक लागला. मात्र, दरातील ही मंदी अल्प काळासाठीच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर भडकलेलेच आहेत. वायदा बाजारामुळे तेलाचे दर किंचित कमी-जास्त होत असले, तरी मोठा फरक पडण्याची शक्यता नाही. पाम तेलाचे दर १४,०००, सूर्यफूल तेल १७,५००, सरकी तेल १५,०००, सोयाबीन १४,७०० आणि करडी तेलाचे दर १८,००० ते १८,५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. वनस्पती तुपाचे दर १,७०० ते २,००० रुपये प्रति डबा असे आहेत.

मद्रास उच्च न्यायालयाने डाळींच्या आयात कोट्याला स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्रात डाळींची आयात थोडी उशिराने होण्याची शक्यता आहे. सध्या हाॅटेल्स बंद असून, लग्न समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत असून, डाळींची मागणी कमी झाली आहे. डाळींच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची मंदी आली. हरभरा डाळीचे दर ६,३०० ते ६,५००, तूरडाळ ९,१०० ते १०,२००, मूगडाळ ९,००० ते ९,८००, मसूर डाळ ७,५०० ते ८,००० आणि उडद डाळीचे दर ९,००० ते १०,००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

मे महिन्यासाठी साखरेचा कोटा २२ लाख टन इतका जाहीर झाला आहे. उन्हाळ्यात सहसा साखरेला मोठी मागणी असते, परंतु लाॅकडाऊनमुळे सध्या साखरेला म्हणावी तशी मागणी नाही. त्यामुळे साखरेच्या दरात तेजी येण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्रातील बहुतांश कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन बंद झाले आहे. चालू हंगामात केवळ महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १५० लाख टन इतके झाले. हे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. मात्र, मागणी अभावानेच बहुतांश कारखाने साखरेची विक्री न्यूनतम निर्धारित मूल्यापेक्षा कमी दराने करत आहेत. सध्या साखरेचे दर ३,२८० ते ३,४०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सोन्या-चांदीच्या दरात सध्या किंचित मंदी असली, तरी ती अल्प काळासाठी असून, पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या खरेदी विक्रीवर सटोरियांची पकड मजबूत आहे. लाॅकडाऊनमुळे सोन्या-चांदीची विक्री सध्या कमी असली, तरी भविष्यात मंदी येण्याची शक्यता नाही. सध्या सोन्याचे दर ४९,००० रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर ७१,००० रुपये प्रति किलो असे आहेत. गव्हाचे दर १,७०० ते २,५०० रुपये प्रति क्विंटल, ज्वारी १,३६० ते ३,४००, बाजरी १,२६० ते १,४००, तूर ६,३०० ते ६,७००, मका १,३०० ते १,५५०, सोयाबीन ६,५०० ते ६,७०० आणि हरभरा ४,९०० ते ५,१०० रुपये प्रति क्विंटल असे दर आहेत.

Zoomed into item.

Web Title: Jalna Market Criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.