जालना बाजारपेठेत नवीन तुरीची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:06 PM2018-12-03T12:06:08+5:302018-12-03T12:06:22+5:30

बाजारगप्पा : दुष्काळाचा मोठा फटका जिल्ह्यातील तुरीला बसलेला असून उत्पन्नात मोठी घट निर्माण झालेली आहे.

In the Jalna market, new pulses arriving started | जालना बाजारपेठेत नवीन तुरीची आवक सुरू

जालना बाजारपेठेत नवीन तुरीची आवक सुरू

googlenewsNext

- संजय देशमुख, (जालना )

दुष्काळाचा मोठा फटका जिल्ह्यातील तुरीला बसलेला असून उत्पन्नात मोठी घट निर्माण झालेली आहे. असे असतानाही जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. मात्र ही आवक फक्त ५० पोते असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरीप आणि रबी हंगामात पूर्वीप्रमाणे ग्राहकी दिसून आली नाही. सोयाबीन वगळता अन्य पिकांचे उत्पादन हे प्रचंड प्रमाणात घटल्याने बाजारपेठेतील उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे. नवीन तुरीची आवक नगण्य असून या तुरीला पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपये भाव मिळत आहे. हा भाव आठवडाभर तरी कायम राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मोसंबीची आवक ५० टक्क्यांनी घटली असून, आता पुढील बहार येईपर्यंत तुरळक आवक राहील. हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे वास्तव आहे. आॅनलाईन नोंदणीत  दोन हजार एकशे आठ शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची नोंदणी केली आहे. या केंद्रावर जालन्यातून मूग ६१०, उडीद १७८, सोयाबीनची नोंदणी केलेल्यांची संख्या ४९० एवढी असून, भोकरदन, अंबड, बदनापूर, तीर्थपुरी आणि परतूर, असे एकूण मूग १००६, उडीद ३६१ आणि सोयाबीनची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही ७४१ एवढी आहे. त्यामुळे आता लवकरच नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी दिली आहे.

दरम्यान सीसीआयकडून कापूस खरेदीचा शुभारंभ सोमवारी बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. सीसीआयकडून ही खरेदी सुरू करण्यात येणार असली तरी याला बराच उशीर झाल्याने या केंद्रावर किती शेतकरी कापूस विक्रीसाठी आणतात हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. जालना बाजारपेठेत कडधान्याच्या भावातील तेजी कायम असून, चना डाळ ५ हजार ८०० ते ६०००, तूर ६ हजार ४०० ते ७००० हजार, मूग डाळ ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपये, मसूर डाळ ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये, गव्हाची आवक ही दररोजची शंभर पोती असून, २१०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

ज्वारीची मागणी कायम असली तरी त्याचा पुरवठा कमी असल्याने भावातील तेजी याही आठवड्यात कायम आहे. ज्वारीने दोन हजार रुपयांवरून उडी मारून २६०० ते ३ हजार ५०० रुपयांवर झेप घेतली आहे. बाजरीदेखील भाव खाऊन जात असून, सध्या थंडीचे दिवस असल्याने बाजरीला मोठी मागणी असून, भाव वाढले असल्याचे सांगण्यात आले. सध्या १ हजार ९०० ते २४०० रुपये क्विंटलवर भाव पोहोचले आहेत. मक्याची आवक तीन हजार पोती असून, मक्याचे भाव मात्र स्थिर आहेत. मक्याचे भाव क्विंटलमागे १ हजार ४०० ते १ हजार ५०० रुपयांवर आहेत. जालना बाजारपेठेत तुरीप्रमाणेच हरभऱ्याची आवक येत असून, ही आवक दररोज ३०० पोती असून, सध्या हरभऱ्याला ४ हजार ७०० रुपयांचा दर मिळत आहे. 

Web Title: In the Jalna market, new pulses arriving started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.