जालन्याचे डास पुण्याच्या प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:17 AM2019-09-25T00:17:51+5:302019-09-25T00:18:45+5:30

साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने नियमितपणे जालना शहरासह ग्रामीण भागातील आठ ते पंधरा डास पकडून पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात.

Jalna mosquito in Pune laboratory | जालन्याचे डास पुण्याच्या प्रयोगशाळेत

जालन्याचे डास पुण्याच्या प्रयोगशाळेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अस्वच्छता, तुंबलेल्या पाण्यामुळे वाढणारे डास आणि त्यामुळे डेंग्यूसह इतर रोगांचा होणारा उद्रेक, हा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरतो. साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने नियमितपणे जालना शहरासह ग्रामीण भागातील आठ ते पंधरा डास पकडून पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. शिवाय करण्यात आलेल्या कीटकशास्त्रीय सर्वेक्षणात जिल्ह्यातील १२ गावे कायम झाली आहेत.
डासांचा उपद्रव वाढल्यानंतर डेंग्यूसह इतर आजार जडण्याची भिती असते. विशेषत लहान बालकांना या आजाराची अधिक लागण होते. साथरोगाचा फैलाव होऊ नये, यासाठी जालना येथील हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरी, ग्रामीण भागात कीटकशास्त्रीय सर्वेक्षण केले जाते. यात डासांची वाढ, एडिस डास अळीत वाढ आढळून आल्यानंतर कायम आणि तात्पुरत्या स्वरूपातील गावांची निवड करून कीटकशास्त्रीय उपाययोजना राबविल्या जातात. जालना जिल्ह्यात या सर्वेक्षणातून कायम १२ गावांची निवड करण्यात आली आहे. यात बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, कुसळी, भोकरदन तालुक्यातील कोदा, जाफराबाद तालुक्यातील गोपी, मंठा तालुक्यातील श्रीराम तांडा, जालना शहरातील लोधी मोहल्ला, हाडप, परतूर तालुक्यातील को. हादगाव, श्रीधर जवळगा, घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव, अंबड तालुक्यातील भाग्यनगर, छत्रपतीनगर या बारा ठिकाणांची कायम सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
याशिवाय ३७ गावांची तात्पुरत्या स्वरूपात सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. यात बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर, माळेगाव, बा.वाहेगाव, उजैनपुरी, दे. पिंपळगाव, मांडवा या गावांचा समावेश आहे. भोकरदन तालुक्यातील आव्हाणा, पारध बु., पारध खु, लतीफपूर, सिरसगाव, तळेगाव, ताडेगाव वा., जाफराबाद तालुक्यातील देऊळझरी या गावांचा समावेश आहे. तर जालना येथील चंदनझिरा, गोकुळधाम, विरेगाव तांडा, अंबड तालुक्यातील शिंदेवाडी, पाथरवाला, मठतांडा, हस्तपोखरी, मसईतांडा, पारनेर, शिरनेर व अंबड शहराची निवड करण्यात आली आहे. घनसावंगी तालुक्यातील रामसगाव, बोलेगाव, शेवता, कुंभार पिंपळगाव, भेंडाळा तर परतूर तालुक्यातील परतूर शहर, नांद्रा, ब्राह्मणवाडी, आष्टी-१ या गावांचा अनिश्चित गावांमध्ये समावेश आहे. या गावात वाढलेले कीटकनाशके, डास निर्मूलनासाठी नियमितपणे उपाययोजना केल्या जातात.
विशेषत विविध आजार फैलावणारे डास कोणत्या प्रकारचे आहेत, याची तपासणी करण्यासाठी डास पकडणारे दोन कर्मचारी (आयसी कीटक समहारक) हिवताप कार्यालयांतर्गत कार्यरत आहेत. हे कर्मचारी नियमित पणे दहा ते पंधरा डास पकडून पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून देतात. या प्रयोगशाळेतून येणाऱ्या अहवालानंतर दक्षतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जातात. त्यानुसार ग्रामपंचायतीलाही दक्षतेबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या जातात.
लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची : लॅब टेक्निशिअनच्या जागा रिक्त
डासांची उत्पत्ती होऊ नये, साथरोगांचा फैलाव होऊ नये, यासाठी कोरडा दिवस पाळणे, नाल्या वाहत्या राहणे, स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यासाठी शहरी, ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष देऊन प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत ही कामे वेळेवर करून घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी जागे राहून ही कामे केली तर साथरोगांचा फैलाव होण्यास अटकाव लागणार आहे.
जिल्ह्यातील ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तासह इतर तपासण्यांसाठी हिवताप कार्यालयांतर्गत लॅब टेक्निशिअनचे पद मंजूर आहे. मात्र, ही पदे भरण्यात न आल्याने या तपासण्यांसाठी उपजिल्हा रूग्णालय किंवा जिल्हा रूग्णालय गाठण्याची वेळ रूग्णांवर येते. तर अनेकांना खाजगी केंद्राचा आधार घ्यावा लागतो.

Web Title: Jalna mosquito in Pune laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.