जालन्यात ३ लाखाच्या गांज्यासह एकजण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 02:20 PM2018-12-21T14:20:05+5:302018-12-21T14:21:59+5:30
आरोपीकडून ३ लाख ५९ हजार ५५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
जालना : तालुक्यातील बाजीउम्रद तांडा येथील एका शेतातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साडेसहा किलों गांजा जप्त केला. ही कारवार्ई गुरुवारी रात्री केली असून, एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. सखाराम झाबु पवार (३३, रा. बाजीउम्रद तांडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख ५९ हजार ५५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री बाजीउम्रद तांडा येथील एका शेतात छापा मारून सखाराम झाबु पवार यांना ताब्यात घेतले. शेतातील झोपडीची पाहणी केली असता, एका गोणीमध्ये गांजा, रोख रक्कम, मोबाईल, एक दुचाकी व दुचाकीला असलेल्या पिशवीत तराजुकाट व वजन माप सापडले. त्यांच्याकडून ६ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकुण ३ लाख ५९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, नायब तहसीलदार गणेश पोलास, कर्मचारी विश्वनाथ भिसे, कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, तुकाराम राठोड, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, फुलचंद हजारे, परमेश्वर धुमाळ, सदाशिव राठोड, वैभव खोकले, सोमनाथ उबाळे, लखन पचलोरे, किशोर जाधव, रवी जाधव, ज्योती खरात, राऊत, हिवाळे आदींनी केली.
कडक कारवाई करण्यात येईल
आम्हाला खबऱ्यामार्फेत माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही गुरुवारी रात्री उशीराही कारवाई केली. गांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- राजेंद्रसिंह गौर, स्थानिक गुन्हे शाखा