जालना शहराचा पारा पोहोचला ४२ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:54 AM2019-04-03T00:54:44+5:302019-04-03T00:55:10+5:30
मंगळवारी जालना शहराचा पारा चक्क ४२.७ अंशावर पोहोचल्याने शहरात दुपारी वर्दळ अत्यल्प दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सध्या सगळीकडे निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण गरमागरम आहे. त्यातच उन्हाने कहर केला असून, मंगळवारी जालना शहराचा पारा चक्क ४२.७ अंशावर पोहोचल्याने शहरात दुपारी वर्दळ अत्यल्प दिसून आली.
जालना शहर व परिसरात यंदा कमी पाऊस पडल्याने उन्हाचा कडाका अधिक जाणवणार हे जवळपास निश्चित होते आणि झालेही तसेच. गेल्या महिन्याभरापासून उन्हाने हळूहळू तीव्रता वाढविली आहे. गेल्या आठवड्याभरात सरासरी तापमान हे ३९ ते ४२ अंश यामध्येच राहिले आहे. आगामी काळात हा तापमानाचा पारा ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कडक उन्हामुळे प्रचार करतानाही उमेदवारांना घाम फुटत आहे. कार्यकर्ते एकत्रित आणतानाही उमेदवाराच्या नाकी नऊ येत आहेत.
उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून पांढऱ्या गमछांना मोठी मागणी वाढली असून, डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेला सन गॉगल्स देखील चढ्या भावाने विक्री होत असल्याचे दिसून आले. उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी शहर व परिसरात जागोजागी शीतपेयांची दुकाने थाटली आहेत. यात विशेष करून रसवंत्यांचा जास्त भरणा असल्याचे दिसून आले.