जालना ठरला सायकल स्पर्धेत अव्वल; जिल्ह्याला मिळाले १३ विजयी स्पर्धक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:57 AM2021-02-05T07:57:11+5:302021-02-05T07:57:11+5:30
जालना : येथील जेईएस महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताकदिनानमित्त ‘फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत सात दिवसीय सायकल राईड या स्पर्धेचे आयोजन दि. २६ ...
जालना : येथील जेईएस महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताकदिनानमित्त ‘फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत सात दिवसीय सायकल राईड या स्पर्धेचे आयोजन दि. २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ६७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. ज्यामध्ये जालना व इतर जिल्ह्यातील विविध वयोगटांतील स्पर्धकांनी निरंतर सात दिवस सकाळी व सायंकाळी आपल्या निवासाच्या ठिकाणी स्वत:च्या क्षमतेनुसार सायकल चालविली आणि पर्यावरणाची होणारी हानी थांबविण्याचा प्रयत्न केला. एकूण सात दिवसांत ८७३० किलोमीटरचा पल्ला पार करून भारत-ऑस्ट्रेलियापर्यंतचे किलोमीटर सर्वांनी मिळून या निमित्ताने पूर्ण केल्याचा अनुभव घेतला.
यशस्वी सायकल रायडर्समध्ये सर्वात जास्त किलोमीटर सायकल चालविणारा नाशिक येथील स्पर्धक डॉ. जयराम डिखले यांनी सात दिवसांत तब्बल ५९९.४३ किलोमीटर सायकल चालवून प्रथम स्थान प्राप्त केले. विशेष बाब म्हणजे डॉ. जयराम यांचे वय ५३ वर्ष असून, त्यांनी सर्वसाधारण दररोज ८० किलोमीटर सायकल चालविली आहे. स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे विजयी मानकरी ठरलेले ठाणे येथील ६८ वर्षांचे युवक प्रवीण कुमार कुलथे यांनी ५५८.१० किलोमीटर सायकल चालवून नवयुवकांसमोर आदर्श निर्माण केला. तिसऱ्या क्रमांकावर जालना जिल्ह्याचे विलास बोधले याने ५०६ किलोमीटर सायकल चालविली. चौथ्या क्रमांकावर तन्मय विलास बोधले याने एकूण ५००.४८ किलोमीटर सायकल चालविली.
उल्लेखनीय बाब म्हणजे ६० वर्षांवरील वयोगटामध्ये जालन्याचे डॉ. त्र्यंबक मगरे यांनी १०९.७८ किलोमीटर सायकल चालवून वयोवृद्धांना आवाहन दिले. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज यांनी करून विजयी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निकालाची घोषणा क्रीडा विभागप्रमुख डॉ. हेमत वर्मा यांनी केली.