जालन्यातील १३२ कोटींची पाणीपुरवठा योजना तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 08:31 PM2021-09-14T20:31:30+5:302021-09-14T20:33:21+5:30

Jalna water supply scheme : जालना शहराला २०१२ मध्ये पैठण येथील नाथसागरातून जलवाहिनी टाकून २५० कोटींची योजना कार्यान्वित केली होती.

Jalna water supply scheme worth Rs 132 crore extended for third time but incomplete | जालन्यातील १३२ कोटींची पाणीपुरवठा योजना तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही अपूर्ण

जालन्यातील १३२ कोटींची पाणीपुरवठा योजना तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही अपूर्ण

Next
ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनेचे काम कासवगतीने

जालना : शहरातील अंतर्गत जलवाहिनी अंथरून नागरिकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी १३२ कोटी रुपयांच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजनेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही ही योजना अपूर्ण आहे. जालना शहराला तीन दिवसांआड एक वेळ पाणी मिळावे म्हणून ही योजना नगरोत्थान योजनेतून हाती घेण्यात आली आहे. असे असताना ही योजना सलग तीन वेळेस विनादंड कंत्राटदारास मुदतवाढ दिली आहे. असे असतानाही ही योजना अपूर्ण असल्याने आजही जालनेकरांना आठवड्यातून एक वेळेसच पिण्याचे पाणी मिळत आहे.

जालना शहराला २०१२ मध्ये पैठण येथील नाथसागरातून जलवाहिनी टाकून २५० कोटींची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेतून जायकवाडतील पाणी गावाच्या वेशीपर्यंत म्हणजेच जालना शहराजवळील इंदेवाडीच्या मुख्य जलकुंभापर्यंत पोहोचले होते. परंतु हे पाणी जालना शहरातील विविध नवीन वस्ती तसेच गल्लीतील नागरिकांच्या घरापर्यंत पोचविण्यासाठी ही १३२ कोटींची अंतर्गत पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे.

आजघडीला जवळपास ३०० किलोमीटरची पाइपलाइन टाकून आठ जलकुंभ जोडल्याचा दावा या कंत्राटदारांकडून केला जात आहे. परंतु ही योजना पूर्ण न झाल्या प्रकरणाचा मुद्दा जालना पालिकेच्या ऑनलाइन झालेल्या सर्वसाधारण सभेत गाजला होता. विशेष करून मुदतवाढ देताना कंत्राटदारास दंड आकारला नसून, त्या कंत्राटदारास याेजना पूर्ण होण्याआधीच जवळपास १०४ कोटी रुपयांचे बिलही अदा केल्याच्या मुद्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु याबद्दल प्रशासनाकडून कुठलेच समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचे दिसून आले.
 

Web Title: Jalna water supply scheme worth Rs 132 crore extended for third time but incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.