जालना जि. प. त कामांचा खोळंबा, १५५ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:57 PM2018-01-31T23:57:30+5:302018-01-31T23:59:01+5:30
मिनी मंत्रालयाच्या कामकाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या सामान्य प्रशासन, पंचायत व वित्त विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. तिन्ही विभाग मिळून वर्ग क आणि ड संवर्गातील सरळसेवा व पदोन्नतीने भरावयाची तब्बल १५५ पदे रिक्त आहेत.
बाबासाहेब म्हस्के/ जालना : मिनी मंत्रालयाच्या कामकाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या सामान्य प्रशासन, पंचायत व वित्त विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. तिन्ही विभाग मिळून वर्ग क आणि ड संवर्गातील सरळसेवा व पदोन्नतीने भरावयाची तब्बल १५५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध कामांचा खोळंबा होत असून एकाच कामासाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.
जिल्ह्याच्या कारभाराचा गाडा चालविणा-या जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन, वित्त व पंचायत या तिन्ही विभागांची भूमिका महत्त्वाची आहे. पंचायत समिती स्तरावर विस्ताराधिकारी, ग्रामविकास अधिकारी, गावपातळीवर काम करणारे ग्रामसेवक हा पंचायत विभागाचा कणा आहे. मात्र, ग्रामसेवकांच्या मंजूर ५५७ पदांपैकी ३६ पदे रिक्त आहेत, तर ग्रामविकास अधिका-यांची २३ पैकी सरळसेवेची सहा तर पदोन्नतीने भरावयाची १२ पदे रिक्त आहेत. वित्त विभागातही वरिष्ठ सहायक लेखा अधिका-यांची सात पदे रिक्त आहेत.
सामान्य प्रशासन विभागामार्फत वर्ग-३, वर्ग-४ कर्मचा-यांच्या नेमणुका, पदोन्नती, जिल्हा बदली, नियतकालीन बदल्या, वाहने, निवृत्ती वेतन, खातेनिहाय चौकशी, उत्कृष्ट कामासाठी वेतनवाढी, गोपनीय अहवाल, खातेनिहाय चौकशी इ. कामे केली जातात. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी यांचे पगार भत्ते, मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या वतीने रचना व कार्यपद्धतीची सर्व विभागांची व पं.स. च्या निरीक्षणाची कामे, नोंदणी शाखेमार्फत मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या नावे येणारे सर्व शासन आदेश, लोकआयुक्त, प्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार व सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून प्राप्त होणारे सर्व पत्रव्यवहार स्वीकारले जातात. या महत्त्वाच्या विभागांतही रिक्त पदांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पेन्शन, सेवानिवृत्ती, चौकशी, गोपनीय अहवाल तयार करणे इ. कामांचा खोळंबा होत आहे. सध्या सुरू असलेली झीरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल मोहिमेला रिक्त पदांचा फटका बसत आहे. स्थायी समिती, सर्वसाधारण सभेच्या कामकाजाची माहिती संकलित करणे, अनुपालन अहवाल तयार करणे, सभेचे ठराव इ. कामे करताना उपलब्ध कर्मचा-यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
---------------
आहे त्या कर्मचाºयांवर ताण
जि. प. त विभागाकडून कामे करून घेणा-या सामान्य प्रशासन विभागात विभागात उच्च श्रेणी लघुलेखकाचे एक, वरिष्ठ लिपिकांची ५३ पैकी १३, कनिष्ठ सहायकांची २०६ पैकी १२ आणि वाहनचालकांची २२ पैकी आठ पदे रिक्त आहेत. याच विभागात पदोन्नतीने भरावयाची वर्ग तीन व चारची ४८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आहे त्या कर्मचा-यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून, सेवा हमी कायदा केवळ कागदावरच राबविला जात आहे.