जालन्याच्या खासदाराचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:42 AM2019-05-23T00:42:18+5:302019-05-23T00:43:11+5:30
जालना लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने मतमोजणी होत आहे. या महिन्याभराच्या कालावधीत अनेक दावे, प्रतिदावे भाजप, काँग्रेसकडून केले जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने मतमोजणी होत आहे. या महिन्याभराच्या कालावधीत अनेक दावे, प्रतिदावे भाजप, काँग्रेसकडून केले जात होते.
भाजपकडून रावसाहेब दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून विलास औताडे यांच्यात थेट लढत झाली. वंचित आघाडीचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या दोन सभा डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्यासाठी झाल्याने निवडणूक चुरशीची झाली. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या स्वार्थाप्रमाणे निवडणुकीचे अंदाज बांधतांना दिसून आले. भाजपच्या गोटात तर यंदाही दानवे यांचा विजय हा अडीच लाख मताधिक्यापेक्षा अधिक मताने होईल, असे दावे केले जात आहेत. परंतु पैठण, फुलंब्री, जालना शहरातील मतदान दानवेंसाठी कुठला संदेश घेऊन येतो ते गुरुवारी स्पष्ट होणार आहे.
शेतकरी विरोधी वक्तव्य तसेच दुष्काळ आणि कर्जमाफीचे मृगजळ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचा रोष मतपेटीतून व्यक्त होतो की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. औताडे यांनी यावेळी गेल्या निवडणुकीपेक्षा अधिकचे परिश्रम घेऊन रण तापवले. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत सर्व राजकीय पक्षांनी प्रचारात उडी घेतली होती. जनता नेमकी कोणाच्या पाठीशी आहे, याची उत्सुकता आता केवळ काही तासांवर येऊन ठेपली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदार संघातील चित्र स्पष्ट होणार आहे.
कडेकोट बंदोबस्त, ४८४ पोलीस तैनात
जालना : लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची गुुरुवारी औरंगाबाद मार्गावरील एका बंद असलेल्या गुटखा कंपनीच्या इमारतीत मतमोजणी होणार आहे. मतमोजणी दरम्यान कुठलाच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे
निकालानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील प्रमुख चौक, प्रमुख उमेदवार आणि राजकीय पक्ष कार्यालयाबाहेरही पोलीस तैनात केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली. जालना लोकसभा मतदान २३ एप्रिल रोजी झाले. तब्बल एक महिन्यानंतर २३ मे रोजी जालना औरंगाबाद मार्गावर असलेल्या संकेत फूड या कंपनीत मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत अनेक मत मतांतरे निर्माण झाली होती. आपणच बाजी मारणार, असा दावा प्रत्येक प्रमुख उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यातून एक चढाओढीचे वातावरण तयार झालेले आहे. एकंदरीत मतमोजणीच्या आधी येत असलेल्या एक्झिट पोलवरुन तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मतमोजणीसाठी उमेदवार मतदान प्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांचे हजारो कार्यकर्ते मतमोजणीस्थळी जमा होतील. मतमोजणीस्थळी तीन उपविभागीय पोलीस अधिकारी १४ पोलीस निरीक्षक, ३७ पोलीस उपनिरीक्षक, ३१९ कॉन्स्टेबल, २४ महिला पोलीस कर्मचारी, सीआरपीएमची कंपनी असा तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. या शिवाय शहरातील प्रमुख चौक, तसेच संवेदनशील भागात पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत.
मतमोजणी प्रक्रिया चालते तरी कशी?
जालना : जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. ही मतमोजणी औरंगाबाद मार्गावरील संकेत फूड कंपनीत होणार आहे. यासाठी आवश्यक ती तयारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पूर्ण केली असून, निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत.
८४ टेबलवरून होणार मतमोजणी
जालना लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघांसाठी प्रत्येकी एकूण ८४ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतमोजणीच्या ठिकाणी एक पर्यवेक्षक, एक सहायक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असे एका टेबलमागे तीन कर्मचारी तैनात करण्यात आले असून, ईव्हीएम मशीन आणून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली गेली आहे.
२६ फेऱ्यांची शक्यता
जालना लोकसभेच्या मतमोजणीसाठी २५ मतमोजणीच्या फे-या होण्याची शक्यता असून, प्रारंभी २४ फेºया होतील, असा अंदाज होता. परंतु दोन फे-यांची वाढ झाली आहे. प्रारंभी ईव्हीएम मशीनची मोजणी पूर्ण झाल्यानंतर पाच व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी होणार आहे.
असे असेल मनुष्यबळ
मतमोजणीसाठी एकूण ८०० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी पर्यवेक्षक आणि उपजिल्हाधिकारी यांची कडक नजर राहणार आहे. निकाल गतीने लागावेत म्हणून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, अॅपच्या माध्यमातून निकाल देण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.