जालन्यातील स्टील उद्योग ५० वर्षात प्रथमच पूर्णत: बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:18 AM2020-03-24T00:18:42+5:302020-03-24T00:19:11+5:30
जालन्यातील स्टील उद्योगाने शहराला देश पातळीवर ओळख निर्माण करून दिली आहे. ५० वर्षात पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उद्योग दहा दिवस बंद राहणार आहे.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बियाणे उद्योगानंतर जालन्यातील स्टील उद्योगाने शहराला देश पातळीवर ओळख निर्माण करून दिली आहे. या उद्योगाची मुहूर्तमेढ स्व. शांतीलाल पित्ती यांनी रोवली होती. त्याला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. तब्बल ५० वर्षात पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उद्योग दहा दिवस बंद राहणार आहे. यामुळे अंदाजित २५० कोटीची उलाढाल ठप्प होणार असून, या मुळे मजूर, स्टील उद्योगाला कच्चा माल पुरविणारे आणि अन्य असे जवळपास ५० हजार व्यक्तींना प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष याचा फटका बसू शकतो.
जालन्यात सध्या दहा मोठे स्टील उद्योग सुरू असून, छोट्या रोलिंग मिल या १२ पेक्षा अधिक आहेत. दहा दिवसांच्या बंदचा विचार केल्यास ६० हजार टन उत्पादन घटणार आहे. याची अंदाजित किंमत २५० कोटी रूपये होते. त्यातच वीज वितरण कंपनीला देखील यामुळे फटका बसला असून, महिन्याला या उद्योगाकडून जवळपास ३०० मेगावॅट वीज घेतली जाते. याचे दरह महिन्याचे बिल हे ८० ते १०० कोटी रूपयांच्या घरात जाते. हे नुकसानही वीज वितरण कंपनीला सहन करावे लागणार आहे. जालन्यातील स्टीलला संपूर्ण महाराष्ट्रासह उत्तर आणि दक्षिण भारतात मोठी मागणी आहे. ज्या प्रमाणे पायाभूत सुविधांचा विकास होत आहे, त्या तुलनेत पाहिजे तेवेढे स्टील आजही देशात उत्पादित होत नाही. परंतु जालन्यातील स्टील उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपल्या उत्पादनात आमूलाग्र बदल केले आहेत. त्यात प्रामुख्याने टीएमटी तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्टीलला गंज चढणार नाही, याची काळजी घेतल्याने या स्टीलला मोठी मागणी आहे. आज या उद्योगाची धडधड थांबल्याने स्टीलची वाहतूक करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका असलेल्या ट्रान्सपोर्ट उद्योगालाही याचा फटका बसला आहे. दररोज ७०० ते १००० हजार ट्रकमधून स्टीलची ने-आण होते. त्या उद्योगाची चाकेही कोरानामुळे थांबली आहेत. स्टील उद्योगा प्रमाणेच जालन्यातील जुना आणि मोठा उद्योग असलेला एनआरबी कंपनी देखील त्यांच्या ४० वर्षाच्या काळात प्रथमच पूर्णपणे शटडाऊन करण्यात आली आहे. अन्य लहान मोठे उद्योजकांनीही कोरोनाच्या मुद्यावर एकत्रित येत बंदमध्ये सहभाग नोंदविला असल्याची माहिती लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष राजेश कामड यांनी सांगितले.
शहरातील स्टील उद्योजकांकडून प्रशासनाला पूर्ण सहकार्य
जालन्यातील स्टील सर्व स्टील उद्योजकांनी मोठ्या कष्टातून आपले नाव उंचावले आहे. आज कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर घोंगावत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही सर्व स्टील उद्योजकांनी आमचे उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात कोरोनाचे संकट कमी न झाल्यास आणखी काही दिवस हा उद्योग बंद राहण्याची चिन्ह आहेत. परंतु आम्ही सर्व स्टील उद्योजक या देशाचेच नागरिक असल्याने कुठल्याही राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी आम्ही एकत्रित येऊन त्याला साथ देत आलो आहोत, आताही आमची भूमिका सकारात्मक राहणार आहे.- योगेश मानधनी, अध्यक्ष स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, महाराष्ट्र