‘जलयुक्त’ची कामे थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:48 AM2018-03-14T00:48:08+5:302018-03-14T00:48:50+5:30

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यात दोन हजार ५५४ कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना असतानाही आतापर्यंत केवळ ५१५ पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान विविध विभागांसमोर आहे.

Jalyukta' works delaying | ‘जलयुक्त’ची कामे थंड बस्त्यात

‘जलयुक्त’ची कामे थंड बस्त्यात

googlenewsNext

बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यात दोन हजार ५५४ कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना असतानाही आतापर्यंत केवळ ५१५ पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान विविध विभागांसमोर आहे.
शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१७-१८ साठी १४९ गावांची निवड झाली आहे. निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी, ग्रामसभा झाल्यानंतर कामांचा गावनिहाय आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात कृषी, जलसंधारण, भूजल सर्वेक्षण, वनविभाग, पंचायत समिती, जलसंपदा आदी विभागांतर्गत नाला-खोलीकरण, रुंदीकरण, सलग समतल चर खोदणे, बांध-बंदिस्ती, सिमेंट नाला बांध, रिचार्ज शॉफ्ट इ. दोन हजार ५५४ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामांसाठी सुमारे ९३ कोटी ४८ लाखांचा निधी प्रस्तावित आहे. पैकी दोन हजार ३४६ कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली एक हजार ७०४ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पैकी ५१५ कामे पूर्ण झाली असून, ९८६ कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर आतापर्यंत चार कोटी ६५ लाख रुपयांचा निधी खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर सर्व कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. मात्र, विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव, तसेच कामांसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध होत नसल्याने अद्याप दोन हजारांवर कामे अपूर्ण आहेत. वर्ष २०१६-१७ मध्ये मंजूर चार हजार ६८० कामांपैकी २२० कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ही कामे मार्चअखेर पूर्ण न केल्यास त्यासाठी आलेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती जलयुक्त शिवार अभियान समितीचे सचिव दशरथ तांभाळे यांनी दिली.

विभागीय आयुक्त घेणार आढावा
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी पूर्ण-अपूर्ण कामांच्या माहितीची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले.
जिल्ह्यात आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांवर चार कोटी ६५ लाख ९४ हजार रुपये खर्च झाले आहेत. कृषी विभागाने सर्वाधिक ४२३ कामांवर तीन कोटी ६५ लाख रुपये खर्च केले आहेत. जलसंधारण, लघु पाटबंधारे, जलसंपदा या विभागांनी अद्याप मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण केलेले नाही.

Web Title: Jalyukta' works delaying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.