जामखेडमध्ये दोन गटांमध्ये हमरातुमरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:18 AM2019-10-22T01:18:51+5:302019-10-22T01:19:34+5:30
अंबड तालुक्यातील जामखेड येथे सोमवारी दुपारी किरकोळ कारणावरून उमेदवारांचे समर्थक असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/ जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथे सोमवारी दुपारी किरकोळ कारणावरून उमेदवारांचे समर्थक असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. जिल्ह्यातील इतर मतदार संघात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
जामखेड येथील मतदान केंद्र क्रमांक २८९ व २८० च्या परिसरात एक मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेला. त्याने एका एजंटाला विचारपूस केली. त्यावेळी दुसऱ्या उमेदवाराच्या समर्थकाने त्या एजंटला धक्काबुक्की केली. यावरून वाद पेटल्याने जमाव झाला होता. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत काही जणांना किरकोळ मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच पोनि अनिरूध्द नांदेडकर, उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. मात्र, या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले होते. जामखेड येथील प्रकार वगळता जिल्ह्यातील इतर मतदार संघात काही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या.