जामखेडच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:08 AM2019-06-03T01:08:13+5:302019-06-03T01:08:57+5:30

अंबड तालुक्यातील जामखेड येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Jamkhed villagers have water wandering | जामखेडच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

जामखेडच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

Next

रूपेश मोहिते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अधिग्रहित केलेल्या दोन विहिरी आटल्या असून, ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पशुधन देखील संकटात सापडले आहे.
जामखेड गावाची लोकसंख्या पंधरा हजार असून, आठ हजार जवळपास मतदार आहेत. सतरा सदस्य व सरपंच असे एकूण अठरा सदस्यांची ग्रामपंचायत कार्यकारिणी आहे. गेल्या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अत्यल्प प्रमाणात पर्जन्यमान्य झाले. त्यामुळे पुढील काळात भीषण पाणीटंचाई जाणवणार याचे स्पष्ट संकेत मिळाले होते.
 जामखेड येथील दहा हातपंप, चार सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे येथे तीव्र पाणीटंचाई भासत आहे.
जामखेड गावांसाठी २०१२ साली माजी जिल्हा परिषद सभापती बप्पासाहेब गोल्डे यांनी सव्वा कोटी रुपयांची ग्रामीण पाणी पुरवठा पेयजल योजना मजूंर करुन आणली होती. परंतु, शुन्य नियोजनामुळे गावातील अंतर्गत पाईपलाइन अद्यापही अपुर्ण आहे.
अंबड तालुक्यातील जामखेड हे गाव सर्वात मोठे आहे. येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग असून, मोठी आर्थिक उलाढाल होते.
सध्या गावाला पाणी पुरवठा करणा-या विहिरींनी तळ गाठला असून, गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी दोन शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. मात्र, अधिग्रहण केलेल्या विहिरींनीही तळ गाठला आहे.
परिणामी, नागरिकांना खाजगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. सरपंच हलीमाबी इब्राहिम कुरेशी यांनी मार्च महिन्यात प्रशासनाकडे चार टँकरचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले होते. मात्र, दोन टँकरच सुरु करण्यात आले आहे.
तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जनावारांच्या चा-याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. जनावरांना पाणी व चारा नसल्याने पशुपालक हैराण झाले आहे. नाइलाजाने त्यांना जनावरांची विक्री करावी लागत आहे. विक्रीसाठी गेलेल्या जनावरांचीही बेभाव विक्री होत असून, पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, जामखेड गावात प्रशासनाने जास्तीच्या टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
दोन हजार जनावरांच्या चा-याचा प्रश्न
जामखेड या गावाची लोकसंख्या पंधरा हजार आहे. परंतु गावात फक्त दोन टँकरनेच पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाण्यामुळे अनेकवेळा ग्रामस्थांमध्ये वादही होतात. या गावात दोन हजार जनावरे आहे.
त्यांच्या चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून कुठलीच मदत करण्यात येत नसल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

Web Title: Jamkhed villagers have water wandering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.