जामवाडीत हेक्टरी दीड कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:59 AM2018-03-30T00:59:58+5:302018-03-30T11:47:06+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये जामवाडी येथील बागायती जमिनीला सरासरी दीड कोटींचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे.

Jamwadi, one and half crore per hector | जामवाडीत हेक्टरी दीड कोटी!

जामवाडीत हेक्टरी दीड कोटी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये जामवाडी येथील बागायती जमिनीला सरासरी दीड कोटींचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. गुंडेवाडी, तांदूळवाडी येथील जमिनीचे दरही वाढले आहेत.
जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी ५१० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पैकी ४४० हेक्टर खाजगी जमीन असून उर्वरीत शासकीय जमीन आहे. आतापर्यंत सुमारे साडेतीनशे हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, जालना तालुक्यातील आंबेडकरवाडी, निधोना, गुंडेवाडी, तांदूळवाडी व जामवाडी या पाच गावांमधील शेतक-यांनी कमी मोबदला मिळत असल्याचे सांगत जमीन संपादनास तीव्र विरोध केला होता. आंबेडकरवाडी येथील शेतक-यांनी समृद्धी महामार्गात जाणा-या जमिनीची संयुक्त मोजणीही बंद पाडली होती.
पाच गावे शहरालगत असल्याने येथील जमिनीला प्रति चौरस मीटरचा दर द्यावा, असे शेतक-यांची मागणी होती. त्यामुळे येथील शेतक-यांनी जमिनीचे खरेदीखत करून दिले नव्हते. तसेच या गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करून नव्याने मोबदला निश्चित करण्याची मागणी केली होती. याबाबत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत रस्ते विकास महामंडळ व जिल्हा प्रशासनातील अधिका-यांची मंत्रालयात वरिष्ठ स्तरावर बैठकही झाली होती. त्यानंतर जिल्हास्तरीय मोबदला निश्चित समितीने या गावांमधील जमिनीच्या दराचे फेरमूल्यांकन करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात मागील आठवड्यात दर निश्चित समितीची बैठक झाली. यामध्ये पाचही गावांमधील बागायती, हंगामी बागायती व जिरायती जमिनीच्या दरांचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. जामवाडी, गुंडेवाडी व तांदूळवाडी येथील बागायती जमिनीला एकरी सरासरी ६० लाख रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. हंगामी बागायती जमिनीला एकरी ४५ तर जिरायती जमिनीला एकरी ३० लाख रुपये दर मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात काही प्रमाणात गटनिहाय तफावत असून, निधोना परिसरात औद्योगिक वसाहतीचा भाग असणा-या जमिनीला प्रति चौरस मीटरप्रमाणे मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
इंटरचेंज पॉइंट स्थलांतर : जामवाडी, गुंडेवाडी, तांदूळवाडीच्या शेतक-यांचा विरोध
जिल्ह्यातून जाणाºया समृद्धी महामार्गावर गुंडेवाडी, तांदूळवाडी शिवारात इंटरचेंज पाइंट (चढ-उतारस्थळ) प्रस्तावित तशी अधिसूचना या पूर्वी काढण्यात आली आहे. हा इंटरचेंज पॉइंट शेतकºयांचा फायद्याचा असून, शेतकºयांची जमीन देण्यास सहमीत आहे. मात्र, काही उद्योजक इंटरचेज पॉइंट निधोना, खादगाव शिवारात हलविण्यासाठी प्रयत्नशील असून, तशा हालचाली वरिष्ठ स्तरावर सुरू आहेत. निधोना शिवारातील जमिनीचे दर सरासरी ८० ते ९० लाख रुपये एकर आहे. तुलनेत गुंडेवाडी, जामवाडी शिवारातील दर कमी आहे. खादगाव शिवारात इंटरचेंज पॉइंट झाल्यास मोबदला देताना शासनाचे नुकसानच होणार आहे. इंटरचेंज पॉइंटचे स्थलांतर झाल्यास त्यास जामवाडी, गुंडेवाडी व तांदुळवाडी येथील शेतकरी तीव्र विरोध करतील, असे समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे प्रशांत वाढेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Jamwadi, one and half crore per hector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.