जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदेंशी मोबाईलवर चर्चा
By विजय मुंडे | Published: September 12, 2023 11:50 PM2023-09-12T23:50:34+5:302023-09-12T23:51:43+5:30
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही चर्चा झाली असून, जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना थेट बोलणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंगळवारी रात्री मोबाईलवर चर्चा झाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही चर्चा झाली असून, जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना थेट बोलणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी मंत्री संदीपान भुमरे, आ. राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी आणि जरांगे यांच्यात जवळपास दोन ते अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनोज जरांगे या दोघांमध्ये मोबाईलवर चर्चा झाली. झालेली चर्चा ही मराठा आरक्षणावर शासन कसे सकारात्मक आहे यावर झाली असावी. समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असल्याचे सामंत यांनी सांगितले. जरांगे यांनी त्यांची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. त्यांचा काही निरोप असेल तर मी त्यांना देईन. त्यांचे उपोषण सुटले पाहिजे, त्यांची प्रकृती चांगली राहिली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठीच ३० दिवसांचा कालावधी मागितला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला ठेवून काम करीत असल्याचेही ते म्हणाले.
चौकट
प्रत्यक्ष यावे अशी मागणी
आरक्षणावर, तब्येतीवर चर्चा आमची चर्चा झाली. पहिल्या समितीने काम केले नाही. पहिले तीन महिने वाया गेले. एक महिन्याचा वेळ आम्ही दिला आहे. आता प्रत्यक्ष यावे म्हणजे आता आम्ही आमरण उपोषण सोडून साखळी उपोषण करू, असे मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्या सकाळी सांगतो, असा निरोप दिल्याचे ते म्हणाले.