जरांगेंचा ईसीजी नॉर्मल, आजपासून दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 05:08 AM2024-03-03T05:08:08+5:302024-03-03T05:08:49+5:30
मनोज जरांगे यांची शुक्रवारी रात्री अचानक तब्येत बिघडली होती. छातीत कळ निघाल्याने त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांचा ईसीजी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वडीगोद्री (जि.जालना) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी रात्री बिघडली होती. त्यांच्यावर खासगी डॉक्टरांनी उपचार केले आहेत. जरांगे यांची प्रकृती ठीक झाली असून, ते रविवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
मनोज जरांगे यांची शुक्रवारी रात्री अचानक तब्येत बिघडली होती. छातीत कळ निघाल्याने त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांचा ईसीजी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशक्तपणा असल्याने रात्री उशिरा सलाइन लावण्यात आले. शनिवारी सकाळीही सलाइन सुरू होते. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जरांगे हे रविवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
‘सगेसाेयऱ्यांवर आम्ही ठाम आहाेत’
जरांगे यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. काहीही झालं तरी आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार, सगेसोयऱ्यावर आम्ही ठाम आहोत. पोलिसांच्या माध्यमातून पोरांचा छळ सुरू आहे. माझ्या सहकाऱ्यांना विनाकारण बोलावून घेत बसवून ठेवले जात असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.