जेसीबीचे चाक डोक्यावरून गेल्याने मजूर ठार; चालकाविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:22 AM2020-01-02T01:22:35+5:302020-01-02T01:22:45+5:30
अजिंठा ते बुलडाणा या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मंगळवारी भोरखेड्या जवळ जेसीबी पाठीमागे घेत असताना झालेल्या अपघातात मजुराचा दबून मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
धावडा : अजिंठा ते बुलडाणा या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मंगळवारी भोरखेड्या जवळ जेसीबी पाठीमागे घेत असताना झालेल्या अपघातात मजुराचा दबून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली. यात बिहार राज्यातील रहिवासी कुमार अरूण पासवान (वय ३०) हे ठार झाले.
या प्रकरणी जेसीबी चालका विरूध्द निष्काळजीपणे वाहन चालवून मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी धावडा जवळील भोरखेडा फाट्याजवळ काम सुरू असतांना जेसीबीचा (एमच. २० इवाय. ८९६) चालकाने अचानक जेसीबी मागे घेतल्याने काम करीत असलेल्या पासवानच्या डोक्यावरून जेसीबीचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला.दुर्घटना घडताच या कामावर असलेल्या बिहारी मजुरांनी जेसीबी चालकाची चांगलीच धुलाई करून दगडफेक केल्याने मोठा गोंधळ उडाला. संतप्त कामगारांनी रस्त्यावरील वाहतूक रोखून राग व्यक्त करून चालकाला अटक करण्याची मागणी केली.
याची माहिती अजिंठा पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर, पोहेकॉ आबासाहेब आव्हाड, अजय मितिगे, रविकिरण भारती, दीपक भंगाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. या गोंधळात जेसीबी चालक गर्दीतून पळून गेला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.