लग्नासाठी आलेल्या महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास
By दिपक ढोले | Published: June 29, 2023 10:32 PM2023-06-29T22:32:28+5:302023-06-29T22:32:51+5:30
या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना : नातेवाइकाच्या लग्नासाठी आलेल्या महिलेचे जवळपास तीन लाख ६१ हजार रूपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना जालना शहरातील बसस्थानकात गुरूवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशिम येथील सुषमा पंजाबराव पडघाण यांच्या नातेवाइकाचे जालन्यात लग्न होते. त्या लग्नासाठी आल्या होत्या. लग्न झाल्यानंतर त्या गुरूवारी सकाळी एका बॅगमध्ये दागिन्यांची पर्स ठेवून वाशिमकडे निघाल्या. जालना बसस्थानकात आल्यावर छत्रपती संभाजीनगर ते पुसद बसमध्ये चढत असताना, चोरट्यांनी बॅगमधील पर्स लंपास केली. बसमध्ये चढल्यानंतर त्यांना दागिने गेल्याचे लक्षात आले. याची माहिती सदर बाजार पोलिसांना देण्यात आली.
सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांनी ५४ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत, तीन लाख रूपये किमतीची पोत, सहा हजार रूपये किमतीच्या दोन नाकातील सोन्याची नथी, एक हजार रूपये रोख असा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.