सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:23 AM2018-01-11T00:23:33+5:302018-01-11T00:23:41+5:30
सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी होणा-या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी होणा-या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदाही हा सोहळा उत्साहात साजरा व्हावा यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र गोरे यांच्यासह उत्सव समितीने केले आहे.
मातृतीर्थावर नतमस्तक होण्यासाठी राज्यभरासह देशविदेशातून बांधव येणार आहेत. जिजाऊ भक्तांची वाढती संख्या बघता चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. निवास, पाणी व्यवस्था इ. सह यंदा ४०० बुकस्टॉल, १०० उपाहारगृहे इ.ची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहनतळ व्यवस्था वाढविली आहे. महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उदयनराजे भोसले, बाबाजीराजे भोसले, संभाजीराजे भोसले, शिवश्री स्वप्नील खेडेकर (अमेरिका) आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठा विधिभूषण पुरस्कार अॅड. मिलिंद पवार, मराठा शिवशाहीर पुरस्कार विजय तनपुरे, मराठा उद्योगभूषण पुरस्कार संजय वायाळ यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. प्रसिध्द खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन होणार आहे. शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर मार्गदर्शन करणार आहे. या महोत्सवाला बहुजन बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश ढवळे यांनी केले आहे.