ग्रंथ दिंडीत जिजाऊसाहेबांनी वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:45 AM2018-12-24T00:45:58+5:302018-12-24T00:46:06+5:30
शहरात दत्त मंदिर महानुभाव मस्तगड ते बगडिया इंटरनॅशनल लॉन्सपर्यंत संभाजी नगरमार्गे रविवारी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
विकास व्होरकटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात दत्त मंदिर महानुभाव मस्तगड ते बगडिया इंटरनॅशनल लॉन्सपर्यंत संभाजी नगरमार्गे रविवारी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक- भक्तांनी व भजणी मंडळांनी या ग्रंथ दिंडीत सहभाग नोंदवून विविध अभंगाचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे यावेळी साक्षी पुंगळे या विद्यार्थिनीने जिजामाता मॉ. साहेब यांची भूमिका साकारून घोड्यावर स्वार झाली होती. यामुळे अनेकांचे लक्ष तिने वेधून घेतले होते.
शहरात १२ वे तपपूर्ती अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार व सोमवारी असे दोन दिवस करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी रविवारी येथे ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अ. ह. साळुंके, आचार्य लोणारकर महाराज, आचार्य सुभद्रा अत्याशास्त्री, डॉ. बी. आर गायकवाड, भास्कर गाढवे यांच्याहस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले.
यानंतर ग्रंथ दिंडीत सामील झालेल्या
भाविकांनी व भजनी मंडळांनी
गोपाला...गोपाला... देवकीनंदन गोपाला...
यासह अनेक अभंग टाळ- मृदंगाच्या गजरात गायले. गोपाळ श्रीकृष्ण भगवान की जय अशा जयघोषांचा गजर करित ही ग्रंथ दिंडी दत्त मंदिर महानुभाव मस्तगड येथून निघाली. सुभाषचंद्र बोस चौक, भगवान महावीर चौक, मामा चौक, बसस्थानक व संभाजीनगर येथून गेलल्या ग्रंथ दिंडीचा समारोप बगडिया इंटरनॅशनल लॉन्स येथे झाला. दरम्यान तेलंगणा राज्यातून आलेल्या गांधेरी मंडळाने विविध पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी अ. भा. महानुभाव साहित्य संमेलनाचे पुरूषोत्तम कारंजेकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष महंत प्रज्ञासागर महाराज, कार्यवाहक उद्धवराज प्रज्ञासागर, आचार्य लोणारकर महाराज, आचार्य जिंतूरकर महाराज, महंत भानुव्यास महाराज, महंत श्री मचाले महाराज, आचार्य श्री हंसराज खामणीकर आदी संत महंतांची उपस्थिती होती.