'जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा'; जालन्यात एल्गार सभेसाठी लाखोंची गर्दी
By विजय मुंडे | Published: November 17, 2023 01:02 PM2023-11-17T13:02:59+5:302023-11-17T13:08:35+5:30
सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते सभेसाठी एकाच मंचावर आल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
अंबड (जि.जालना) : आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा.. एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देत आज सकाळी ८ वाजेपासूनच लाखो ओबीसी समाज बांधव अंबड (जि.जालना) येथील आरक्षण बचाव एल्गार सभेसाठी दाखल झाले आहेत.
जालना मार्ग, पाचोड मार्ग, बीड, घनसावंगी मार्गावरून सकाळी ८ वाजल्यापासून सभास्थळी येणाऱ्या नागरिकांचा ओघ सुरू झाला होता. कोणी दुचाकीवरून तर कोणी चारचाकी वाहनातून सभेसाठी अंबड शहरात दाखल झाले होते. सभास्थळी विविध गीते गात आरक्षणाचे महत्त्व विषद केले जात आहे. सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते सभेसाठी एकाच मंचावर आल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या छायाचित्राने वेधले लक्ष
आरक्षण बचाव एल्गार सभास्थळी येणाऱ्या युवकांच्या हाती स्व. गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र होते.हे छायाचित्र उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. शिवाय एकच पर्व, ओबीसी सर्व यासह इतर घोषवाक्य असलेले फलक हाती घेवून युवक घोषणाबाजी करीत होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
आरक्षण बचाव एल्गार सभेसाठी लाखो ओबीसी समाज बांधव अंबड शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे वाहन पार्किंगसह समाज बांधवांना सभास्थळाकडे जाण्याचा मार्ग दाखविण्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसरत सुरू होती.
पाणी, अल्पोपहाराची सोय
अंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेसाठी येणाऱ्या ओबीसी समाज बांधवांसाठी ठिकठिकाणी पाणी, अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. पाणी, अल्पोपहार वाटपासाठी स्वयंसेवकही काम करीत होते.