महावितरणचे कनिष्ठ अभियंता जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:08 AM2019-08-30T01:08:36+5:302019-08-30T01:09:11+5:30
लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले.
जालना : नवीन डीपीचा सर्वे करीत इस्टिमेंट तयार करून पुढे पाठविण्याच्या कामासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. ही कारवाई गुरूवारी दुपारी परतूर तालुक्यातील सातोना येथे करण्यात आली.
अमोल अशोक मोहिते असे आरोपीचे नाव आहे. महावितरणच्या परतूूर उपविभागांतर्गत सातोरा येथील शाखा कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत असलेल्या डीपीवरून पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने एका शेतकºयाने वैयक्तिक खर्चातून दोन डीपी घेण्याचे ठरविले. त्यानुसार सातोना येथील
महावितरणचे कनिष्ठ अभियंता अमोल मोहिते यांच्याकडे एका तक्रारदाराने यांची भेट घेऊन डीपीसंदर्भात सर्वे करून इस्टिमेट तयार करून देण्याची विनंती केली. त्यावेळी मोहिते यांनी या कामासाठी दहा हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित शेतक-याने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत पथकाने गुरूवारी दुपारी सातोना येथील महावितरणच्या कार्यालयात पंचासमक्ष पडताळणी करून सापळा रचला. तक्रारदाराच्या कामासाठी लाचेची मागणी करून पाच हजार रूपये स्वीकारल्यानंतर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोनि विनोद चव्हाण, ज्ञानेश्वर जुंबड, मनोहर खंडागळे, ज्ञानेश्वर म्हस्के, सचिन राऊत, खंदारे, शेख यांच्या पथकाने केली.