बस रस्त्याच्या खाली; ३० विद्यार्थी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:04 AM2019-07-09T01:04:33+5:302019-07-09T01:04:54+5:30
पावसामुळे या रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस रस्त्याच्या खाली गेली होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने ३० विद्यार्थी बालंबाल बचावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : पावसामुळे या रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस रस्त्याच्या खाली गेली होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने ३० विद्यार्थी बालंबाल बचावले. ही घटना सोमवारी सकाळी पाथरवाला (बु.) ते कुरण पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका खाजगी शाळेच्या बसद्वारे शहागड, वाळकेश्वर, अंकुशनगर, पाथरवाला बु. ते कुरण येथील विद्यार्थी नेले जातात. ही बस सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेत कुरणकडे जात होती. मात्र, कुरण मार्गावर पावसामुळे झालेल्या चिखलातील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ती बस अचानक रस्त्याच्या खाली गेली. बस उलटण्याचा धोका यावेळी उद्भवला होता. मात्र, बसचालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला आणि बसमधील ३० विद्यार्थी बालंबाल बचावले. दरम्यान, या रस्त्यासाठी २०१६ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कोट्यवधी निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, अवैध वाळू वाहतूक, मुरूम वाहतुकीसह जड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. परिणामी थोडाही पाऊस झाला तर या रस्त्यावर चिखल होत आहे. मात्र, रस्त्याच्या अवस्थेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
महाकाळा - पाथरवाला (बु.) - कुरण- वाळकेश्वर- शहागड रस्ता कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत साडेसहा कोटी रुपये निधी असून, एका कंपनीने हे काम घेतले आहे.
मात्र, तीन वर्ष झाले तरी या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते सय्यद तारेख, शहरप्रमुख लक्ष्मण धोत्रे यांनी केला.