सॅटेलाईट केंद्रावरून ड्रोन गेल्याने एकच धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:32 AM2019-02-23T00:32:18+5:302019-02-23T00:34:03+5:30
जालन्यापासून जवळच असलेल्या इंदेवाडी येथील सॅटेलाइट सेंटर - भू-अणूश्रवण केंद्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर आहे. असे असताना बुधवारी दुपारी एका ड्रोनने या केंद्रावरून घिरट्या घातल्याने याची माहिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीसांना कळविली. ही माहिती मिळताच पोलीस प्रशासन झपाटून कामाला लागले आणि शोधा-शोध सुरू झाला..
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यापासून जवळच असलेल्या इंदेवाडी येथील सॅटेलाइट सेंटर - भू-अणूश्रवण केंद्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर आहे. असे असताना बुधवारी दुपारी एका ड्रोनने या केंद्रावरून घिरट्या घातल्याने याची माहिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीसांना कळविली. ही माहिती मिळताच पोलीस प्रशासन झपाटून कामाला लागले आणि शोधा-शोध सुरू झाला.. परंतु हा शोध लागल्यावर खोदा पहाड निकला... चुहा या उर्दूतील म्हणी प्रमाणे पोलीस आणि संबंधित यंत्रणेची गत झाली. मात्र देशातील अतिरेक्यांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर या अत्यंत महत्वाच्या ठरणा-या केंद्रावरून ड्रोन जाणे म्हणजे गंमतीचा भाग नव्हता हे देखील तेवढेच खरे.
जालन्यात इंदेवाडी येथे साधारपणे ३० वर्षापूर्वी या सॅटेलाईट केंद्राची स्थापना केलेली आहे. जालन्यात हे केंद्र होण्यामागे जालन्यातील भौगोलिक स्थिती ही बाब महत्वाची ठरली. या केंद्राचे महत्व हे भारतीय उपग्रहाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. या केंद्रातून भारताने साडेलेल्या विविध उपग्रहांची अवकाशातील स्थिती तसेच त्यावरील नियंत्रण ठेवण्याचे काम येथून अत्यंत गोपनीयरित्या चालते.मध्यंतरी देशभर गाजलेला स्पेक्ट्रम घोटाळ्या नंतर कोणत्या कंपनीला किती स्पेक्ट्रम दिले आणि त्यांनी त्याचा किती वापर केला याची मोजदाद करण्याचे संशोधन येथे करण्यात आले होते. या बद्दल येथील शास्त्रज्ञांचा गौरवही पंतप्रधनांच्या हस्ते करण्यात आला होता.
सॅटेलाईट केंद्रावरून ड्रोन गेल्याने एकच धावपळ
बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या सॅटलोईट केंद्रावरून ड्रोन गेल्याचे येथील अधिकाºयांच्या लक्षात आले. या गंभीर बाबीची माहिती लगेचच त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. ही माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी अत्यंत गोपनीयपणे पोलीसांना या ड्रोनचा शोध घेण्याचे सांगितले. त्यांनी याचा शोध घेतला असता, हे ड्रोन जालन्यातील नगर पालिकेकडून मालमत्ता कराचे सर्वेक्षण करण्यासाठीचे असल्याचे पुढे आले आणि पोलीस तसेच सॅटेलाई यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान या एजंसीला ड्रोनव्दारे जालन्यातील मालमत्ता कराचे सर्व्हेक्षण करण्याची परवानगी पालिकेने दिली असल्याचे दिसून आल्यावर नाट्यावर पडदा पडला.