शंभू महादेव विद्यामंदिर शाळेत कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:22+5:302021-03-07T04:27:22+5:30
वाटुर फाटा : परतूर तालुक्यातील वाटुर फाटा येथील शंभू विद्यामंदिर शाळेला दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी ...
वाटुर फाटा : परतूर तालुक्यातील वाटुर फाटा येथील शंभू विद्यामंदिर शाळेला दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी शुक्रवारी भेट देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जाधव म्हणाल्या की, मुलींनी आत्मनिर्भर होऊन स्वतःचे रक्षण स्वतः करायला शिकावे. शिक्षणाची जिद्द आणि चिकाटी अंगी असावी. आपल्याला पुढे काय व्हायचे त्याची जिद्द असायलाच हवी. फक्त चूल आणि मूल एवढेच नव्हे तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची जिद्द असायला हवी. महिला व मुलींवर अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. एखादी वाईट घटना घडत असताना आपल्याला कोणी मदत करेल, याची वाट न पाहता मुलींनी स्वतःचे संरक्षण स्वतःच करावे, असेही त्या म्हणाल्या.
मुख्याध्यापक ओवळे म्हणाले की, मुली उच्चशिक्षित होऊन आपल्या पायावर उभा राहिल्या तर निश्चित महिलांवरील अत्याचार कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर योग्य वयातच विवाह होणे आवश्यक आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहामुळे अनेक समस्या उभ्या राहतात. कधी-कधी तर मुलींचे आयुष्य यातून उद्ध्वस्त होते. त्यामुळे मुलींनीच पुढे येऊन बालविवाहाला विरोध करायला हवा. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल साबळे, सुरेखा राठोड, सुरेश पाटील, शंभू महादेव विद्यामंदिरचे मुख्याध्यापक ओवळे, उपमुख्याध्यापक आदबने, सरपंच कमलबाई केशरखाने, डॉ. आशा केशरखाने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.