काजळा ग्रामपंचायतीवर ‘जनसेवा’ पॅनेलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:31 AM2021-01-20T04:31:37+5:302021-01-20T04:31:37+5:30
बदनापूर : तालुक्यातील काजळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी पॅनेलच्या उमेदवारांना पराभूत करून ११ पैकी आठ ...
बदनापूर : तालुक्यातील काजळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी पॅनेलच्या उमेदवारांना पराभूत करून ११ पैकी आठ जागांवर वर्चस्व प्रस्थापित करून विजय मिळविला आहे.
ग्रामपंचायतीच्या चार वॉर्डांतील एकूण ११ जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत जनसेवा ग्रामविकास पॅनेलचे ११, तर प्रतिस्पर्धी आदर्श ग्रामविकास पॅनेलचे १० उमेदवार परस्पर विरोधी उभे होते. त्यात वॉर्ड क्रमांक तीनमध्ये तीन अपक्ष उमेदवारांनी उडी घेतल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची बनली होती. वॉर्ड क्रमांक एकमध्ये जनसेवा ग्रामविकास पॅनेलचे ज्ञानेश्वर बोबडे व वैशाली मदनुरे हे बहुमताने विजयी झाले. वॉर्ड क्रमांक दोनमधून कैलास खंडेकर, प्रयाग देवकाते, नीला मदने, वॉर्ड क्रमांक तीनमधून रंगनाथ देवकाते व पुष्पा गावडे, तर वॉर्ड क्रमांक चारमधून मनोहर जाधव हे बहुमतांनी विजयी झाले आहेत. इतर तीन जागेवर एक अपक्ष आणि दोन आदर्श ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत.
या निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी पॅनेलच्या उमेदवारांना पराभूत करून ११ पैकी ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच जनसेवा ग्रामविकास पॅनेलचाच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आता आरक्षण सोडत रद्दबाबतच्या याचिकेचा निकाल २२ जानेवारीला लागणार असल्याने त्यानंतरच ही निवड होणार हे मात्र नक्की.
पती-पत्नीच्या विजयाने गावात जल्लोष
जनसेवा ग्रामविकास पॅनेलकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले रंगनाथ देवकाते व प्रयागा देवकाते हे पती - पत्नी बहुमताने विजयी झाल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी जल्लोषात आनंद साजरा केला. रंगनाथ देवकाते यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. कारण, वॉर्ड क्रमांक दोनमध्ये त्यांच्या पत्नी प्रयागा देवकाते या निवडणूक रिंगणात उभ्या होत्या. वॉर्ड क्रमांक तीनमध्ये ते स्वत: उभे होते. त्यात वॉर्ड क्रमांक तीनमध्ये त्यांना प्रतिस्पर्धी विरोधी पॅनेलच्या उमेदवाराबरोबरच अपक्ष उमेदवारानेही आव्हान उभे केले होते. मात्र, मतदारांनी या दोघा पती - पत्नीला आपल्या मताचा कौल देऊन बहुमताने विजयी केले.