कोरोना नियंत्रणासाठी स्वच्छता ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:32 AM2020-03-12T00:32:57+5:302020-03-12T00:33:44+5:30
नागरिकांनी स्वच्छता राखून बाहेर फिरताना स्वच्छ रूमाल बांधून फिरण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो स्वच्छतेचा त्यामुळे जालना पालिकेसह जिल्ह्यातील पालिका, जिल्हा परिषद तसेच एसटी महामंडळ, रेल्वे स्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य देण्यासह वैयक्तिक पातळीवरही नागरिकांनी स्वच्छता राखून बाहेर फिरताना स्वच्छ रूमाल बांधून फिरण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिल्या. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी बुधवारी गायकवाड यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के.. राठोड यांनी प्रारंभी आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी यापूर्वीच घेतली आहे. संशयितांची तपासणी करण्यासह वेळप्रसंगी त्यांना अन्य रूग्णांपासून दूर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक ते डॉक्टर तसेच औषधींचा साठाही मुबलक असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांवर नजर ठेवणयसाठी आम्ही जाणीवजागृती केली आहे. एखाद्यास सर्दी, मोठ्या प्रमाणावर खोकला येऊन तो थांबत नसेल तर, अशा व्यक्तींनी तातडीने जवळच्या रूग्णालयात जावे अथवा जिल्हा सामान्य रूग्णालयात येऊन आरोग्य तपासणी करण्याची सूचनाही दिल्याचे राठोड म्हणाले. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेततील मुलांचे हॉस्टेल हे ताब्यात घेतले असून, वेळप्रसंगी संशयितास त्या भागात ठेवण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.
एकूणच या बैठकीत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच जालना पालिकेचे मुख्याधिकारी यांनाही विशेष सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी कचरा टाकताना तो घंटागाडीतच टाकण्याची सक्ती करण्यात आली असून,त्यासाठी घंटागाड्यांच्या फेरी वाढण्यिावरही चर्चा करण्यात आल्याचे निवृत्ती गायकवाड यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या अधिका-यांनाही बस स्वच्छ ठेवण्यासह प्रवाशांना काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने हातरूमालाचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज चालक तसेच वाहकांनी प्रवाशांना आवर्जून सांगावी.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या तसेच प्रत्यक्ष गावातही स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी अधिकाधिक लक्ष देण्याचे सांगितले. उपमुख्याधिकारी लोंढे यांनी या बाबत जिल्हा परिषदेने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांना तत्पर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
आढावा : घाबरून न जाण्याचे आवाहन
कोरोना व्हायरस हा जास्त म्हणजेच २५ डिग्री सेल्सियसमध्ये जिवंतच राहू शकत नाही. त्यामुळे सर्दी, खोकला झाल्यास आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, हा गैरसमज करून घेऊ नये. काळजी घेणे ही बाब नाकारून चालणार नाही. परंतु त्यामुळे भीती पसरेल असे कोणीही अफवा पसरवू नये असेही निर्देश यावेळी नागरिकांमध्ये द्यावेत, असे सांगण्यात आले.