सोने तारण ठेवून मजूर शहराकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:48 AM2019-01-31T00:48:16+5:302019-01-31T00:50:19+5:30
यंदा दुष्काळ असल्याने ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात अनेक कुटूंब हे स्थलांतर करून मोठ्या शहरात जात आहेत.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात यंदा दुष्काळ असल्याने ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात अनेक कुटूंब हे स्थलांतर करून मोठ्या शहरात जात आहेत. जवळ जे काही सोने-नाणे आहे, ते सोबत घेऊन जाण्यापेक्षा ते बँकेत तारण ठेवून त्यावर गोल्डलोन काढून रोख पैसे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून राष्ट्रीयीकृत बँक आणि खासगी वित्तीय संस्थांकडे सोने तारण ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे.
सोने हा मौल्यवान धातू असल्याने त्याला मोठी मागणी आणि तेवढीच त्याची किंमत जास्त आहे. आपल्याकड सोन्याला रोखीपेक्षाही मोठे महत्व असते. तो वाहून नेण्यास सोपा असण्यासह त्याची किंमत क्वचितच कमी होते. त्यामुळे सोन्याला अनन्य महत्व भारतींयामध्ये आहे. गरीबातील गरीबही सोने खरेदीसाठी जिवाचे रान करून बचत करतो, आणि त्यातून थोडे का होईना सोने हे खरेदी करतो.
महिलांमध्ये तर या धातूची आवड त्याचे महत्व हे त्या जाणून असतात. अर्ध्यारात्री कामा येणारे सोने म्हणूनच त्याला संबोधले जाते.
जालना जिल्ह्यात दुष्काळी वातावरण असल्याने आज ग्रामीण भागात हाताला काम नसल्याने अनेक कुंटुंब हे उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे, तसेच अन्य मोठ्या शहरात स्थलांतर करत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे असलेले थोडेबहूत सोने हे बँकांमध्ये तारण ठेवून गोल्डलोन घेण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. जालन्यातील काही राष्ट्रीयकृत बँकांकडे सोने ठेवण्यासाठी लॉकर कमी पडत असल्याचे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकाने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर सांगितले. सोने तारण योजनेचे अनेक फायदे असून, त्यावर काढलेले कर्ज हे परतफेड करताना त्याचा कालावधी जास्त असून, व्याजदरही कमी आहेत.
पूर्वी खासगी सावकाराकडे शेतजमिन गहाण ठेवण्याचे प्रमाण होते, परंतु आता खासगी सावकाराचे व्याजाचे दर हे न परडवणारे नसून, त्यांची पठाणी वसुली ही देखील गंभीर बाब असल्याने लोकांचा कल हा बँकांकडे वाढल्याचेही सांगण्यात आले.
स्थलांतराची माहिती देत नाहीत
आज दुष्काळामुळे अनेकजण गावातून शहराकडे जात आहेत. मात्र हे कुटुंब बाहेरगावी जाताना त्यांनी त्याची माहिती ही संबंधित ग्रामपंचायतला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याची तसदी कोणी घेत नसून, आम्ही रोजगाराच्या शोधात जात आहोत, हे कारण सांगणेदेखील सामाजिकदृष्ट्या चांगली बाब नसल्याने अनेक जण पूर्वकल्पना न देताच गाव सोडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. एकूणच शहरात गेल्यावर तेथे निवासाचा मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो.