खोतकर-गोरंट्याल यांच्या टाळीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:45 AM2018-05-05T00:45:29+5:302018-05-05T00:45:29+5:30
गेल्या वर्षभरापासून राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातून विस्तवही आडवा जात नव्हता. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सर्वांसमोर खोतकर आणि गोरंट्याल यांनी प्रारंभी हस्तांदोलन केले आणि नंतर एकमेकांच्या हातावर टाळी दिली.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या वर्षभरापासून राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातून विस्तवही आडवा जात नव्हता. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सर्वांसमोर खोतकर आणि गोरंट्याल यांनी प्रारंभी हस्तांदोलन केले आणि नंतर एकमेकांच्या हातावर टाळी दिली.
गेल्या तीस वर्षाचा जालन्याचा राजकीय इतिहास पाहिला तर कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर हे महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीतही त्यांचे शहरी आणि ग्रामीण पॅनल एकमेकांविरोधात उभे असायचे. त्यावेळी देखील अर्जुन खोतकर यांनी या निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले होते. अर्जुन खोतकरांची राजकीय कारकिर्द ही शिवसेनेतून सुरू झाली. वयाच्या २५ व्या वर्षी ते १९९० मध्ये जालन्याचे आमदार झाले. तर कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू केली होती. ते १९९१ मध्ये पहिल्यांदा जालना पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नंतर १९९३ मध्ये कैलास गोरंट्याल हे नगराध्यक्ष झाले. आणि नंतर १९९९ मध्ये ते आणि खोतकर हे जालना विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर आले. त्यात खोतकर यांचा पराभव होऊन गोरंट्याल हे आमदार झाले होते. २००४ मध्ये पुन्हा या दोघांमध्ये थेट लढत झाली आणि आणि खोतकर विजयी झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांना शिवसेनेने राजेश टोपे यांच्या घनसावंगी मतदार संघात निवडणुक लढविण्याचे आदेश दिले. त्यावेळी तेथेही खोतकर यांनी राजेश टोपे यांना मोठी टक्कर देत ८३ हजार मते मिळवली. मात्र, ते तेथे पराभूत झाले होते. विधानसभेच्या त्याच निवडणुकीत जालना मतदार संघातून काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल विजयी झाले होते.
बऱ्याच दिवसानंतर दोघेही एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलल्याने याचे वेगळे अर्थ काढले जात होते. खोतकर आणि गोरंट्याल यांच्यातील ही टाळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखरपेरणी तर नाही ना.. असेही तर्कवितर्क लावले जात आहेत.
विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी जालना विधानसभेतून निवडणूक लढविली त्यावेळी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी हे कैलास गोरंट्यालच होते. या निवडणुकीत खोतकर यांचा २९६ मतांनी विजय झाला होता. याच निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतांना द्यावा लागणारा बी फॉर्म खोतकर यांनी वेळेत दाखल न केल्याचा मुद्दा उपस्थित करून कैलास गोरंट्याल यांनी याला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते.
ही याचिका न्यायालयाने निकाली काढून, आ. अर्जुन खोतकर यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द ठरविले होते. या औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात अर्जुन खोतकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावेळी त्यांच्या सदस्यत्व रद्दला स्थगिती देण्यात आली. मात्र आता या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून, १० मे रोजीची तारीख देण्यात आली आहे. असे असतानाच शुक्रवारी झालेल्या जाहीर कार्यक्रमात ही टाळी दोघांनी एकमेकांना कोणत्या मुद्यावरून दिली, याची सभागृहात लगेचच कुजबूज सुरू झाली.