मुलांनो, मैदानावर खेळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:21 AM2017-12-25T01:21:01+5:302017-12-25T01:21:50+5:30
मोबाईलवरील खेळांमध्ये गुुंतण्यापेक्षा मुलांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. पालकांनीही जागरुक राहून मुलांच्या भावविश्वाचा विचार करावा, असे प्रतिपादन लेखिका डॉ. छाया महाजन यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मोबाईलवरील खेळांमध्ये गुुंतण्यापेक्षा मुलांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. पालकांनीही जागरुक राहून मुलांच्या भावविश्वाचा विचार करावा, असे प्रतिपादन लेखिका डॉ. छाया महाजन यांनी केले.
अ. भा. साने गुरुजी कथामाला (जालना)च्या वतीने रविवारी येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात आयोजित दोनदिवसीय बालकुमार महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर साहित्यिक नरेंद्र लांजेवार, प्रा. बसवराज कोरे, डॉ. रमेश अग्रवाल, डॉ. नारायण बोराडे, सुनील रायठठ्ठा, केशरसिंह बगेरिया, राधिका शेटे , जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, कार्यवाह आर. आर. जोशी, कार्याध्यक्ष जमीर शेख, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, संतोष लिंगायत यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. महाजन म्हणाल्या की, हा बाल व्यक्तिमत्त्व घडविणारा महोत्सव आहे. माणसाने माणसाप्रमाणे वागावे हा संदेश साने गुरुजींनी दिला. साने गुरुजींचे संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य जालना येथील अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने सुरू आहे. मोबाईलमुळे मुले एकलकोंडी होत असून, ब्ल्यू व्हेलसारख्या हिंसक खेळांमध्ये अडकत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मुलांशी गोष्टींच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी मुलांना सकारात्मकतेने वागण्यासह स्वच्छतेचा संदेश दिला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी व स्व. दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर नरेंद्र लांजेवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. स्व. बाबूराव जाफराबादकर शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. भक्ती पवार हिने स्वागतगीत गायले. डॉ. सुहास सदाव्रते यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विद्या दिवटे यांनी सूत्रसंचालन केले. आर. आर.जोशी यांनी आभार मानले. उद्घाटन सत्रास विविध ठिकाणांहून आलेल्या साहित्यप्रेमी नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मुक्त संवाद कार्यक्रम
बालकुमार महोत्सवात अध्यक्षा डॉ. छाया महाजन, उद्घाटक नरेंद्र लांजेवार, कथाकार मुकुंद तेलीचेरी यांनी बालकांशी मुक्त संवाद साधला. नरेंद्र लांजेवार यांनी मुलांना बोलते करुन त्यांच्या पालकांविषयीच्या भावना अभिनयातून समजावून घेतल्या. पुणे येथील कथाकार मुकुंद तेलीचेरी यांनी विनोदी कथा सांगून मुलांना खळखळून हसविले. डॉ. छाया महाजन यांना मुलांनी प्रश्न विचारुन त्यांच्यातील लेखिकेला बोलते केले.
बालकुमारांचे कविसंमेलन रंगले
बालकुमार महोत्सवात ज्येष्ठ बालसाहित्यकार उद्धव भयवाल यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमारांचे कविसंमेलन चांगलेच रंगले. कविसंमेलनात अभिषेक बनकर, प्रणिता मेहेत्रे यांनी कवितेतून संदेश दिले. अंजली जुंबड या विद्यार्थिनीने ‘आई’ नावाची कविता सादर करुन उपस्थितांना अंतर्मुख केले.