जाफराबाद येथील कीर्तन महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:37 AM2019-01-07T00:37:04+5:302019-01-07T00:37:22+5:30
श्रीमद् संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि कीर्तन महोत्सवास आदर्शनगर जाफराबाद येथे रविवारपासून प्रारंभ झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : श्रीमद् संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि कीर्तन महोत्सवास आदर्शनगर जाफराबाद येथे रविवारपासून प्रारंभ झाला आहे. गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ येथील प.पूज्य परिवाजकाचार्य स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज यांच्या मधुरवाणीतून भागवत कथा सांगितल्या जात आहे. दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंंत भागवत कथा व रात्री कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी नगरप्रदक्षिणा व दिंडी सोहळ्यास सुरवात झाली. ध्वज पूजन, दीपप्रज्वलन, वीणा पूजन, दुपारी प.पूज्य महेशगिरी महाराज यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. सप्ताह व ज्ञान यज्ञ सोहळ्यास ठिक ठिकाणचे संत महंत भेटी देऊन मार्गदर्शन करणार आहे. भागवत कथा वाचन करताना कथे मधील भाव आणि सर्व पात्र यांचीसुद्धा अनुभूती या निमित्ताने उपस्थित भाविक भक्तांना येणार आहे.
कीर्तन महोत्सवात कीर्तनकार म्हणून ह. भ.प.महेशगिरी महाराज, शिवाजी महाराज तळेकर, ज्ञानेश्वर महाराज शेलूदकर, विकास महाराज बाहेकर, सोनुने गुरुजी, भरतबुवा रामदासी यांचे तर शेवटच्या दिवशी रात्री व सकाळी काल्याचे कीर्तन हे प.पू. स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराजांचे होणार आहे. या महोत्सवाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे सध्या गावात धार्मिक वातावरण आहे.