किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार; चोघांना अटक
By दिपक ढोले | Published: April 15, 2023 06:07 PM2023-04-15T18:07:39+5:302023-04-15T18:07:58+5:30
पोलिसांनी संशयित चार जणांना केली अटक
जालना : किरकोळ कारणावरून एका तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील मोदीखाना भागातील गुडीमाता मंदिरासमोर शुक्रवारी रात्री उशिरा घडली. अभिजीत शिवाजी वाघमारे (३०, रा.मोदीखाना) असे गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संशयित आकाश रावसाहेब राऊत, स्वप्निल उर्फ सोनू रावसाहेब राऊत, शेख अरबाज, अक्षय राशनकर, राहुल उर्फ पिल्लू नंदू पांडव (सर्व रा.मोदीखाना) यांनी गुडीमाता मंदिरासमोरील रस्त्यावर गैर कायद्याची मंडळी जमवून अभिजीत वाघमारे यास जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर, पाठीवर गंभीर वार करून जखमी केले. नंतर संशयित घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, सदर बाजार ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस उपनिरीक्षक भताने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी संदीप वाघमारे (रा.मोदीखाना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार जणांना केली अटक
पोलिसांनी संशयित आकाश रावसाहेब राऊत, शेख अरबाज, अक्षय राशनकर, राहुल उर्फ पिल्लू नंदू पांडव (सर्व रा.मोदीखाना) या चौघांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी दिली.