कोंडवाडे बंद; मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:19 AM2019-01-09T00:19:55+5:302019-01-09T00:20:09+5:30
शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला आहे. परिणामी वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच छोट्या- मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नगर पालिकेकडून मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कुठलीही मोहीम राबविली जात नसल्याचे पहावयास मिळत आहे.
विकासाच्या प्रगतीकडे झेपावणाऱ्या जालना शहरात सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे झाली आहेत. परंतु, रस्त्यावरच मोकाट जनावरे उभी राहत असल्याने पादचा-यांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत
आहे.
मात्र, आताचा थोडासा त्रास आगामी कालावधीत खड्डेविना प्रवासाचा होणार असल्याने वाहनचालकही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परंतु, नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
शहरातील मामा चौक, सिंधी बाजार, छत्रपती शिवाजी पुतळा परिसर, मंमादेवी मंदिर परिसर, गांधी चमन, बसस्थानक परिसर, महावीर चौक, दाना बाजार, जुना मोंढा, भोकरदन नाका, पाणीवेस, शनि मंदिर परिसर, महात्मा फुले मार्केट, अलंकार चौक, टांगा थांबा हे प्रमुख चौक व परिसर आहेत.
त्यामुळे या परिसरात नेहमी वाहनांची वर्दळ असते. परंतु, याच ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यांवर थांबत आहेत. सकाळी, सायंकाळी पादचा-यांसह वाहनधारकांना मार्ग काढणेही कठीण होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
गांधी चमन, महात्मा फुले भाजी मार्केट, लतीफ शहा बाजार, नूतन वसाहत, चंदनझिरा या भागात भाजीपाला विक्रेते थांबतात. याच परिसरात मोकाट जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. ग्राहकांना भाजीपाला देत असताना आमचे थोडेसेही सर्व बाजूस दुर्लक्ष झाले की, जनावरे कधी येतील आणि भाजीपाल्यावर ताव मारतील, याची शाश्वतीच नसते. त्यामुळे आम्हाला नेहमीच नजर ठेवावी लागते असे विक्रेत्यांनी सांगितले.
वर्षभरापासून बंद : कोंडवाडे झाले गायब
जुन्या शहरातील जिल्हा परिषदेच्या निवासस्थानाच्या पाठीमागे एक कोंडवाडा होता. या कोंडवाड्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. तसेच देऊळगाव राजा रोडजवळ एक कोंडवाडा होता. तो कोंडवाड तर पडण्याचे काम सध्या सुरु आहे. याबाबत न.प.चे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, शहरातील कोंडवाड्यांची लवकरच दुरुस्ती करण्यात येईल. व मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
शहरात जवळपास ७०० पेक्षा जास्त मोकाट जनावरे आहेत. परंतु, पालिकेचे अधिकारी हे केवळ शंभरच्या जवळपास अशी जनावरे असल्याचे सांगून फारसे गांभीर्य दाखवित नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे शहरवासियांबरोबरच वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.