नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र अन् इतरांना नाही, हे मान्य नाही; मनोज जरांगेंची भूमिका
By विजय मुंडे | Published: October 30, 2023 02:53 PM2023-10-30T14:53:32+5:302023-10-30T14:53:57+5:30
एका भावाला आरक्षण आणि दुसऱ्याला नाही, अशी आमची इच्छा नाही. सरकारचीही असू नये.
जालना : समितीच्या अहवालानुसार नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि इतरांना नाही, ही भूमिका आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे. आम्ही आर्धवट आरक्षण घेणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत मी आंदोलन थांबविणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
मनाेज जरांगे पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. विखे पाटील यांनी माझ्याशी संवाद साधला आहे. समितीचा प्रथम अहवाल स्वीकारला आहे. मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलाविली आहे. त्यावर आपण त्यांना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. एका भावाला आरक्षण आणि दुसऱ्याला नाही, अशी आमची इच्छा नाही. सरकारचीही असू नये. अन्यथा मी आंदोलन थांबविणार नाही. समितीच्या अहवालाला राज्य मागास वर्ग आयोगाचा दर्जा देवून तो अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय उद्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत करावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
सोळुंके खोडील आहेत
प्रकाश सोळुंके यांचे घर पेटवून दिल्याचा विषय जरांगे पाटील यांच्या समोर उपस्थित करण्यात आला. त्यावर ते खोडील आहेत. काहीतरी बोलले असतील म्हणून असे घडले. मराठा समाजाचे शांततेत आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाचाळ बोलणाऱ्यांना आवर घालावा. तिथल्या पोलिसांनी मराठ्यांच्या पोरांना त्रास देवू नये. अन्य था मी तेथे पोरं घेवून येईन, असा इशाराही त्यांनी जरांगे पाटील यांनी दिला.
केंद्राने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरिटीपीटेशनची तारीख पडणार नाही
मराठा आरक्षणाच्या बाबतीत पंतप्रधानांना सांगितले की नाही याचे उत्तर मिळालेले नाही. केंद्राने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरिटीपिटेशनची तारीख पडणार नाही. क्युरिटीपिटेशन दाखल आहे ती स्वीकारायची की नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा असा प्रश्नही जरांगे यांनी उपस्थित केला.
आत्महत्या करू नका, उद्रेक करू नका
आपण आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आहे. आत्महत्या करू नका, उद्रेक करू नका, आपण लढून मराठा आरक्षण मिळवू, अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली.