कुंडलिका नदी स्वच्छता करणाऱ्यांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:58 PM2020-03-02T23:58:19+5:302020-03-02T23:58:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : समस्त महाजन ट्रस्ट आणि रोटरी क्लबसह शहरातील ४५ स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन पंधरा दिवसांपूर्वी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : समस्त महाजन ट्रस्ट आणि रोटरी क्लबसह शहरातील ४५ स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन पंधरा दिवसांपूर्वी जालन्यातून वाहणा-या कुंडलिका व सिना नदीपात्राच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. सोमवारी देहडकरवाडी पुलाजवळ काही नागरिक नदीपात्रात कचरा टाकत होते. हा कचरा नदीत टाकू नका, असे आवाहन त्यांना केल्यावरही त्यांनी ते न मानता उलट स्वच्छता करणा-या कार्यकर्त्यांना मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली असून, या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जालना शहरातील नद्यांची स्वच्छता करण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने समस्त महाजन ट्रस्ट आणि अन्य संस्थांनी पुढाकार घेऊन हे अभियान सुरू केले आहे. मोठ्या धडाक्यात या अभियानाला प्रारंभ होऊन नदीपात्र स्वच्छतेला प्रतिसादही मिळत होता. दरम्यान, रामतीर्थ येथून सुरू झालेले हे स्वच्छता अभियान आता देहडकरवाडी पुलापर्यंत पोहोचले आहे. सोमवारी जेसीबीद्वारे स्वच्छता मोहीम सुरू होती. याचवेळी एका रिक्षातून आलेल्या नागरिकांनी सोबत आणलेला कचरा नदीपात्रात टाकण्याचा प्रयत्न केला. हा कचरा येथे टाकू नये आम्ही येथे स्वच्छता अभियान राबवीत आहोत. त्यामुळे सहकार्य करावे, अशी विनंती कर्मचा-यांनी केली. परंतु, तुम्ही आम्हाला रोखणारे कोण ? असा सवाल करीत स्वच्छता कर्मचा-यांसह स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आलेल्या बाहेरगावच्या सदस्यांनाही जमावाने मारहाण केली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांना कळविण्यात आल्यावर त्यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित मारहाण करणाºया अज्ञातांविरूध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी शहरातील स्वच्छता प्रेमी नागरिक सोमवारी सायंकाळी कुंडलिका नदीपात्रात एकत्रित आले होते. त्यांनी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून पोलिसांनी मारहाण करणा-यांना अटक करावी, अशी मागणी केली. घटनेची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनाही देण्यात आली. त्यांनी देखील याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणी शेख अन्सार याला कदीम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्वच्छता मोहिमेला खीळ!
कुंडलिका आणि सिना नदीतील स्वच्छता मोहिमेला या मारहाणीमुळे खीळ बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूणच जालन्यात सकारात्मक काम होत असताना असा प्रकार घडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.