भरपाईसाठी लाखावर अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:22 AM2017-12-09T00:22:50+5:302017-12-09T00:23:34+5:30
बोंडअळीने बाधित कपाशी पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील एक लाखावर शेतक-यांनी आतापर्यंत ‘जी’ फार्म नमुन्यात कृषी विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत.
जालना : जिल्ह्यातील दोन लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीमुळे बाधित झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. बोंडअळीने बाधित कपाशी पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील एक लाखावर शेतक-यांनी आतापर्यंत ‘जी’ फार्म नमुन्यात कृषी विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत.
जिल्ह्यात यंदा दोन लाख ७८ हजार हेक्टरवर कपाशी लागवड झाली होती. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांनी धडपड करून कपाशी पीक जगविले. त्यानंतर झालेल्या पावसाचा कपाशीला चांगला फायदा झाला. मात्र, परतीच्या पावसामुळे ऐन वेचणीस आलेल्या कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीही शेतक-यांनी मोठ्या हिमतीने कपाशीची निगा घेतली. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या फवारणीवर मोठा खर्च केला. मात्र, गुलाबी बोंडअळीमुळे आता जिल्ह्यातील सर्वच कपाशी पिकांचे क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाने ‘जी’ फॉर्म भरण्याची गुंतागुंतीची प्रक्रिया सुरू केली आहे. हा फॉर्म भरताना शेतक-यांना तक्रार अर्जासोबत बियाणे खरेदी केल्याच्या पावतीबरोबर सातबारा, एकूण जमिनीचा दाखला, कुठल्या कीटकनाशकांची फवारणी केली याची सर्व माहिती भरावी लागत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शेतक-यांकडे बियाणे खरेदीच्या पावत्या नसल्याने अर्ज भरताना मोठी गैरसोय होत आहे. ग्रामपंचायत स्तरावर जी फॉर्म उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे निर्देश असतानाही या फार्मसाठी शेतक-यांना तालुका कृषी कार्यालयात यावे लागत आहे. काही ठिकाणी सहा पानांच्या ‘जी’ फॉर्मसाठी दहा रुपये घेतले जात आहेत. बोंडअळीने कपाशी बाधित झालेल्या एक लाखावर शेतक-यांनी आतापर्यंत तक्रार अर्ज दाखल केले असून, ही संख्या वाढणार असल्याची माहिती कृषी विभागाचे जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी सयप्पा गरंडे यांनी दिली. आता कृषी विभाग तालुकानिहाय पथके स्थापन करून बाधित शेतक-यांचे कपाशी पिकांचे पंचनामे करून ‘एच’ फॉर्म नमुन्यात माहिती भरणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर अशाच प्रकारच्या ‘आय’ फॉर्ममध्ये ही कृषी आयुक्तांकडे ही माहिती पाठवली जाणार आहे. त्यानंतर कृषी आयुक्त स्तरावरून संबंधित बियाणे कंपनीकडे नुकसान भरपाई दावा केला जाणार आहे. संबंधित कंपनीने यास नकार दिल्यास शेतकºयांच्या बाजूने अशी ही गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचे एका जबाबदार अधिका-याने सांगितले.
कंपनीवरील कारवाईसाठी तक्रार अर्ज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोंडअळीबाधित कपाशी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. हे पंचनामे कृषी विभागामार्फत सरसकट केले जाणार आहेत. पंचनाम्यानंतर बाधित शेतक-यांना केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून किंवा राज्य सरकारकडून मदत मिळू शकेल. मात्र, संबंधित सीड्स कंपनीकडे भरपाई दाव्यासाठी शेतक-यांना ‘जी’ फॉर्म नमुन्यातील अर्ज भरावा लागेल, असे जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी स्पष्ट केले.
..........................
३० टक्के नुकसान झाल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून म्हणजेच केंद्र शासनाकडून आर्थिक मदत मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील बोंडअळीने नुकसान झालेल्या कापूस पिकाचा थेट पंचनामा करण्यात येत आहे.
- शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी, जालना.
......................
महिको कंपनीविरुद्ध गुन्हा
बदनापूर पोलीस ठाण्यात महिको सीड्स कंपनीविरुद्ध महाराष्ट्र कापसून अधिनियम २००९, तसेच भादवी ३२० नुसार फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने वितरित केलेल्या बीटी कपाशी बियाण्यांमध्ये बोलगार्ड दोन (बीजी दोन) या कमकुवत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उगवण चांगली झालेली असतानाही कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. सदोष बीटी तंत्रज्ञानाच्या बियाण्यामुळे कपाशी उत्पादक शेतकºयांची फसवणूक होऊन मोठ नुसकसान झाले, असे कृषी विभागातील जिल्हा गुणनियंत्रक सयप्पा गरंडे यांनी, या सदंर्भात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. तक्रार दाखल करण्यापूर्वी कृषी विभागाच्या तालुका व जिल्हा गुणनियंत्रणक पथकाने बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील शेतकरी अशोक ज्ञानदेव मुटकुळे यांच्या शेतातील पॅशन बीजी -२ व बलराज बीजी- २ या बोंडअळीने बाधित कपाशी वाणांचे पंचनामे केले होते. पंचनाम्यात मुटकुळे यांच्या शेतातील ०. ६० हेक्टर क्षेत्रावरील ७८ टक्के कपाशी पीक बाधित झाल्याचे समोर आले. त्यामुळे या शेतकºयाचे ६० हजारांचे नुकसान झाले. या महिको सीड्स कंपनी जबाबदार असल्याने कंपनीसह जबाबदार व्यक्तींवर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड हे करीत आहेत.
.....................