संवादाचा अभाव धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:42 AM2018-12-24T00:42:25+5:302018-12-24T00:42:33+5:30
परस्परांशी संवाद नसणे हाच धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर असून, आपली विचारप्रणाली व्यक्तिनिष्ठ न होऊ देणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी केले.
प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महदंबा साहित्यनगरी : ‘परस्परांशी संवाद नसणे हाच धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर असून, आपली विचारप्रणाली व्यक्तिनिष्ठ न होऊ देणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी केले.
येथील बगडिया इंटरनॅशनल येथे उभारलेल्या आद्य कवयित्री महदंबा साहित्यनगरीत आयोजित १२ वे तपपूर्ती अ. भा. महानुभाव साहित्य संमेलनात आज सायंकाळी झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. बडवे बोलत होते. ‘धर्म सामंजस्य : काळाची अपरिहार्य गरज’ विषयावरील या परिसंवादात अनिल शेवाळकर (कपाटे), प्रा. मा. रा. लामखडे, माजी वनमंत्री सुरेंद्र भुयार आणि प्रा. बसवराज कोरे यांनी सहभागी होवून विचार मांडले.
प्रा. मा. रा. लाकखडे यांनी बहुधर्मी, बहुसंप्रदायी, बहुभाषी असलेल्या आपल्या देशातील परंपरा विसंवादी बनल्याने वातावरण कलुषित होत असल्याचे नमूद केले. एका बाजूला धार्मिक धु्रवीकरण तर दुसऱ्या बाजुला धर्मनिरपेक्षतेचा आग्रह हे वर्तमान वास्तव असून, त्यामुळे लोकशाही धोक्यात येण्याची चिन्हे असल्याचा इशारा देत प्रा. लामखडे म्हणाले की, धर्माने कट्टरतावादाने नव्हे तर समानतेच्या मार्गानेच सर्वांचे हित व कल्याण साधले जाऊ शकेल. धार्मिक सामंजस्यच प्रगतीला पोषक असते यावर त्यांनी भर दिला.
अनिल शेवाळकर (कपाटे) यांनी श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान व शिकवण या अंगाने लिखित भाषण वाचून दाखविले. पूर्वी आस्तिक व नास्तिक हे दोनच प्रवाह होते. परंतु, आता तिसरा स्वच्छंदी प्रवाह निर्माण झाला असून तो हावी होऊ लागला आहे.
अध्यात्माच्या अंगाने त्यास अपेक्षित वळण देणे स्पष्ट आणि आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. प्रा. डॉ. ऋषिबाबा शिंदे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.