पोलीस आणि महसूल प्रशासनात समन्वयाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:58 AM2021-02-05T07:58:04+5:302021-02-05T07:58:04+5:30
मंठा : तालुक्यात वाळू घाटांचे लिलाव होत नसल्याने बांधकाम करण्यासाठी वाळू मिळत नाही. त्यामुळे वाळूमाफियांचे फावत आहे. वाळूमाफिया ...
मंठा : तालुक्यात वाळू घाटांचे लिलाव होत नसल्याने बांधकाम करण्यासाठी वाळू मिळत नाही. त्यामुळे वाळूमाफियांचे फावत आहे. वाळूमाफिया पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने रात्रंदिवस वाहने चालवून जादा दराने वाळू पुरवितात. वाळू तस्करीचा हा गोरखधंदा तेजीत असण्यास पोलीस व महसूल प्रशासनातील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
मंठा तालुक्यात सध्या पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू व्यवसाय तेजीत आहे. यात अधिकाऱ्यांचे उखळ चांगलेच पांढरे होत असल्याची तालुक्यात चर्चा आहे, तर दुसरीकडे वाळूमाफिया रात्रंदिवस शहरातून वाळूची सुसाट वाहतूक करताना दिसून येतात.
चार दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाळू तस्करांचे आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा असून, त्यानंतर वाळूची वाहने जोमाने धावू लागल्याचे पाहावयास मिळत आहे. या सर्व बाबींना नागरिक वैतागले असून, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
---------------------
पोलिसांकडून जबाबदारी झटकण्याचे काम
वाळूमाफियांकडून महाराष्ट्रात महसूल पथकावर जीवघेणे हल्ले होत आहेत आणि पोलिसांकडून पाहिजे तेसे सहकार्य मिळत नाही, यासाठी महसूल अधिकाऱ्यांचे महाराष्ट्रात सामूहिक रजा आंदोलन असल्याने मी सुटीवर आहे त्याचा गैरफायदा वाळूमाफिया घेत आहेत. पोलीस प्रशासन त्यांची जबाबदारी झटकून महसूल प्रशासनाकडे बोट दाखविण्याचे काम करीत आहे.
-- सुमन मोरे, तहसीलदार मंठा.
------------------------
पोलीस निरीक्षकांनी बोलणे टाळले
तस्करांकडून होत असलेल्या वाळूचोरीसंदर्भात पोलीस निरीक्षक निकम यांच्याशी संपर्क साधला असता, वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी महसूल आणि पोलिसांना शासनाचे आदेश असतात, एवढे बोलून त्यांनी या विषयावर नंतर बोलू म्हणून बोलायचे टाळले.