असुविधांच्या गर्तेत दुय्यम निबंधक कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:09 AM2018-03-28T01:09:26+5:302018-03-28T11:09:28+5:30
शासनाला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणारे येथील दुय्यम निबंधक कार्यालय (रजिस्ट्री आॅफिस) असुविधांच्या गर्तेत सापडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासनाला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणारे येथील दुय्यम निबंधक कार्यालय (रजिस्ट्री आॅफिस) असुविधांच्या गर्तेत सापडले आहे. वरिष्ठ स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही आवश्यक सोयी-सुविधा मिळत नसल्याने येथील अधिकारी व कर्मचारीही वैतागले आहेत.
येथील जुन्या तहसील कार्यालयाला लागूनच रजिस्टी कार्यालय आहे. तहसील कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाले. मात्र, या कार्यालयाच्या इमारतीचे काम रखडल्याने रजिस्ट्रीचे व्यवहार जुन्याच ठिकाणाहून सुरू आहेत. जमिनी, घर, प्लॉटस व अन्य खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी या कार्यालयात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची कायम गर्दी असते. आॅनलाइन दस्त नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय प्रणालीचे काम बहुतांश वेळा सर्व्हर डाऊन राहत असल्याने संथगतीने होते. त्यामुळे नागरिकांना तासनतास ताटकळत बसावे लागते. कार्यालय व परिसरात कुठल्याच भौतिक सुविधा उपलब्ध नाही. खरेदी-विक्री व्यवहाराकरिता येणा-यांना बसण्यासाठी पुरेशा खुर्च्याही उपलब्ध नाही. त्यामुळे महिला व वृद्धांची गैरसोय होते. कार्यालयात पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही. परिसरात स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होते. कार्यालयासमोरील अस्ताव्यस्त पार्किंग डोकेदुखी ठरत आहे. कार्यालयालगत अनेकांनी टपºया टाकून अतिक्रमण केले आहे. एकंदरीत या कार्यालयाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
संगणक गेला दुस-याच विभागात
दुय्यम निबंधक कार्यालयासाठी काही दिवसांपूर्वी एक संगणक मंजूर झाला.मात्र, संगणक दुय्यम निबंधक कार्यालयात पोहण्याऐवजी तहसील कार्यालयात पाठविण्यात आला. वारंवार पत्रव्यवहार करूनही संगणक अद्यापही परत मिळालेला नाही. कधी प्रिंटर बंद पडते, तर कधी टोनर संपते. या प्रकारामुळे येथील अधिकारी व कर्मचा-यांना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा अधिका-यांना तात्पुरता खर्च स्वत:च्या खिशातून भागविण्याची वेळ येते, असे एका वरिष्ठ अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.