‘सगेसोयरे’मुळे ओबीसीच नव्हे तर एससी, एसटी आरक्षणावरही गदा; हाकेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:05 AM2024-06-19T09:05:14+5:302024-06-19T09:05:42+5:30
ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाही, तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता, अशी टीका हाके यांनी यावेळी सरकारवर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : ‘सगेसोयरे’चा अध्यादेश लागू झाला तर फक्त ओबीसी बाधित होत नाही, तर एससी आणि एसटी यांच्या आरक्षणावर पण गदा येते. शासन जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही हे लेखी सांगत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला.
ओबीसी आरक्षण बचावसाठी हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा मंगळवारी सहावा दिवस होता. यावेळी हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही? हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगावे. तसे उत्तर लेखी द्यावे. ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाही, तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता, अशी टीका हाके यांनी यावेळी केली.
प्रकाश आंबेडकरांनी केली विचारपूस
- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याशी फोनवर चर्चा केली.
- शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही आंदोलकांशी फोनद्वारे चर्चा करून विचारपूस केली.
- उद्धवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वडीगोद्रीत उपोषणस्थळी हाके व वाघमारे यांची भेट घेतली.
मनोज जरांगे यांना दिले आव्हान
आम्ही कोणत्या नेत्याला टार्गेट केले नाही. आम्ही कायदा तोडून काहीही केले नाही. यांना ओबीसी कोण हे माहिती आहे का? अशी टीका हाके यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यावर केली. तसेच माझ्या समोर चर्चेला बसावे, मी सर्व उत्तरे देतो, असे खुले आव्हानदेखील जरांगे यांना हाके यांनी दिले.
पाणी पातळी खालावली
- ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची सकाळी तपासणी केली.
- दोन्ही आंदोलकांचे ब्लड प्रेशर चांगले आहे, मात्र पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे चक्कर येत आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याचे, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.