जालन्यात पावसाच्या टक्केवारीत मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:55 AM2019-10-23T00:55:06+5:302019-10-23T00:55:47+5:30
जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. जालन्यात मतदानाची टक्केवारी घटली असतानाच पावसाची टक्केवारी वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यापासून जालन्यात परतीच्या पावाने धुवाधार बॅटींग केली आहे. त्यामुळे वार्षिक सरारीच्या जवळपास पाऊस पडण्याची शक्यता हवान खात्याने वर्तवली आहे. जालना जिल्ह्याची सरारासरी ही ६८८ मिलिमीटर एवढी आहे. मंगळवारी सकाळी आणि नंतर सायंकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली.
या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील मतदानावरही झाला आहे. मंगळवारी सायंकाळी तसेच रात्री दहा वाजेच्या सुमारास जालना शहरात धुवाधार पाऊस झाला. हा पाऊस मुंबईच्या धर्तीवर पडत होता. दुपारी चार तास उघडीप दिल्यावर सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाचे पुनरागमन झाले.
जालना जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास ६१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. ३१ आक्टोबर पर्यंत असाच पाऊस पडणार असल्याचे वृत्त असून, असेच चित्र कायम राहिल्यास यंदाची दिवाळी ही पावसात साजरी करण्याची वेळ जालनेकरांवर येणार आहे.
परतीच्या पावसामुळे रबी हंगामतील शाळू ज्वारीसह हरभरा पिकासाठी चांगला आहे. असे असतांनाच सोयाबीन तसेच अन्य पिकांची काढणी करतांना अडचणी येत आहेत. या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होत आहे.