लसीसाठी मोठी सुई; वेस्टेजमुळे पळता भुई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:26+5:302021-09-15T04:35:26+5:30
जालना : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या एडी सिरिंजचा केंद्राकडून अपुऱ्या प्रमाणात पुरवठा केला जात आहे. सिरिंजचा तुटवडा निर्माण ...
जालना : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या एडी सिरिंजचा केंद्राकडून अपुऱ्या प्रमाणात पुरवठा केला जात आहे. सिरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याने बालकांच्या लसीकरणासाठी वापरली जाणारी २ सीसीची सिरिंज वापरली जात असून, त्यामुळे वेस्टेजचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.
कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी प्रशासनाकडून लसीकरणावर अधिकचा भर देण्यात आला आहे. लसीकरणासाठी वापरण्यात येणारी एडी सिरिंज ही केंद्र शासनाकडून पुरविली जात होती. या सिरिंजमुळे कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस प्रमाणात देण्यास मदत होत होती. शिवाय ती सिरिंज कायम लॉक करणेही सहज शक्य होते; परंतु या एडी सिरिंजचा केंद्राकडून सध्या अपुऱ्या प्रमाणात पुरवठा केला जात आहे. सिरिंज अपुऱ्या पडत असल्याने बालकांच्या लसीकरणासाठी वापरली जाणारी २ सीसीची सिरिंज वापरण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. याचा बालकांच्या लसीकरणावरही काही अंशी परिणाम होताना दिसत आहे.
काय आहे एडी सिरिंज?
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी वापरलेली एडी सिरिंज जी वापरल्यानंतर तात्काळ लॉक करून डिस्पोज करता येते. नंतर त्या एडी सिरिंजचा वापर कोठेही करता येत नाही.
२ सीसी सिरिंज कशी असते?
२ सीसी सिरिंज ही दोन एमएलची आणि आकाराने थोडीशी मोठी असते.
ही सिरिंजही मॅन्युअली डिस्पोज करता येते; परंतु त्यामुळे वेस्टेजचे प्रमाण वाढत आहे.
८००० सिरिंज लागतात रोज जिल्ह्याला
जिल्ह्यात सरासरी ८० ते १०० केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. त्यासाठी जवळपास ८ ते १० हजार सिरिंज रोज लागत आहेत.
वेस्टेज वाढले
एडी सिरिंजचा वापर लसीकरणासाठी केला जात असल्याने वेस्टेजचे प्रमाण कमी होते; परंतु सध्या २ सीसीच्या सिरिंज वापरल्या जात आहेत. त्यामुळे वेस्टेजचे प्रमाण जवळपास दोन टक्क्यांच्या आसपास गेले आहे.
एडी सिरिंजचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. असे असले तरी २ सीसीची सिरिंज वापरून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. लसीच्या वेस्टेजचे प्रमाण कमी करण्यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत.
-डॉ. जयश्री भुसारे, लसीकरण अधिकारी