पदापेक्षा काम मोठे- मनोहर खालापुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:12 AM2019-04-01T00:12:15+5:302019-04-01T00:13:13+5:30
पदापेक्षाही मी काम मोठे समजतो, असे मत लायन रिजन एजेएफ मनोहर खालापुरे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : पदापेक्षाही मी काम मोठे समजतो, त्यामुळे कितीही मोठे पद मिळाले तरी या लायन्स क्लबच्या माध्यमातून स्वीकारलेले जनसेवेचे काम सोडणार नाही, असे मत लायन रिजन एजेएफ मनोहर खालापुरे यांनी व्यक्त केले.
येथील एमजेएफ लायन मनोहर खालापुरे यांची लायन्स रिजन- ५ सन २०१९- २० साठी ‘रिजन चेअर पर्सन’ म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचा लायन्स क्लब सदस्य व शहरवासियांतर्फे गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शिवाजी दरगड होते. प्रमुख अतिथी म्हणून तज्ज्ञ शिक्षिका अंजली अंभूरे, माजी नगराध्यक्ष अजीज सौदागर, संजीवनी खालापुरे, दत्तात्रय खवल, डॉ. कमलेश सकलेचा, पुरूषोत्तम राठी होते.
यावेळी लायन्स खालापुरे म्हणाले, या क्लबच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक मोफत नेत्र शस्त्रक्रिया केल्या, हजारो रूग्णाच्या तपासण्या केल्या, वृक्ष लागवडीसह विविध सामाजिक उपक्रम शहर व ग्रामीण भागात राबवले.
या कार्याची दखल घेत माझी रिजन चेअर पर्सन म्हणून नियुक्ती केली. हा केवळ माझ्या एकट्यावर टाकलेला विश्वास नसून आपणा सर्वांचा गौरव आहे. या बरोबरच १६ क्लबची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
या पदाने व गौरवाने मी भारावून न जाता क्लबच्या माध्यमातून समाज सेवेचे काम अखंड सुरूच ठेवणार असेही त्यांनी सांगितले.