सौरऊर्जेवरील दिवे मोजताहेत शेवटच्या घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:29 AM2021-04-11T04:29:06+5:302021-04-11T04:29:06+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरातील अनेक गावांमध्ये महाराष्ट्र ऊर्जा प्राधिकरणातर्फे लावण्यात आलेले दिवे देखभाल, दुरुस्तीअभावी बंद ...
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरातील अनेक गावांमध्ये महाराष्ट्र ऊर्जा प्राधिकरणातर्फे लावण्यात आलेले दिवे देखभाल, दुरुस्तीअभावी बंद आहेत. काही दिवे चोरट्यांनी चोरून नेले तर काही गावपुढाऱ्यांनी त्यांचा वापर स्वतःच्या घरी केला आहे.
सौरऊर्जेवर चालणाऱ्या पथदिव्यांच्या माध्यमातून गावामध्ये उजेड पाडण्याचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले होते. पण, चोरट्यांनी ‘अंधेरा कायम रहे’चा नारा देत सौरदिवे व बॅटरी चोरण्याचा सपाटा लावला आहे. काही वर्षांपूर्वी पारध परिसरातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत सौरदिवे उभारण्यात आले. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. गावातील चौक, सार्वजनिक ठिकाणे, समाजमंदिर अशा ठिकाणी सौरदिवे बसविण्यात आले. हे दिवे बसविल्यानंतर काही दिवसांत दिव्यांच्या बॅटरी, लाइट चोरीला गेले. या कारणामुळे ग्रामपंचायत़ीच्या हद्दीत बसविण्यात आलेले दिवे बंद आहेत. हा प्रकार दिसायला किरकोळ असला, तरी यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवे बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.